पुणे : दीड लाखाचे मेफेड्रोन जप्त | पुढारी

पुणे : दीड लाखाचे मेफेड्रोन जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंमली पदार्थांची विक्री करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने वानवडी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे 10 ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल, दुचाकी असा तीन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मतीन हुसेन मेमन (वय 21, रा. सबेरा पार्क, कोंढवा), शाहरुख कादीर खान (वय 29, रा. युनिटी पार्क, कोंढवा), अनमोलसिंग मनचंदा सिंग (वय 33, रा. साईद्वारका सोसायटी, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौघांच्या विरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी परिसरात अंमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी लुल्लानगर परिसरात दोन तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मेमन, खान यांना पकडले. चौकशीत साथीदार सिंग याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी मेमन, खान, सिंग शहरात अंमलीपदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंके, योगेश मोहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के आदींनी ही कारवाई केली.

Back to top button