पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी पहाट, एकपात्री कार्यक्रम, जादूचे प्रयोग, नृत्य महोत्सव, काव्यमैफिली अन् ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमांनी यंदाची दिवाळी खास ठरणार असून, दिवाळीमध्ये एकपात्री कलाकार असो वा ऑर्केस्ट्रातील कलाकार, नाट्य कलाकार असो वा नृत्य कलाकार, प्रत्येक जण बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी सज्ज आहेत. कलाकार तयारीला लागले असून, कार्यक्रमांना यंदा चांगली बुकिंगही मिळाली आहे. नाट्यगृहांच्या बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी कलाकारांसाठी गोड असेल; तर रसिकांना सांस्कृतिक पर्वणी अनुभवता येणार आहे.
दिवाळीत पाडव्याला रंगणारे 'दिवाळी पहाट' असो वा इतर दिवशी रंगणार्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पुण्याला परंपरा आहे. दोन वर्षे दिवाळीत असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत. यंदा ही कसर भरून निघणार आहे. 20 ऑक्टोबरपासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. गायन-वादनाचे कार्यक्रम, नृत्य, विनोदी कार्यक्रम, एकपात्री कार्यक्रम, कविसंमेलन, जादूचे प्रयोग, अभिवाचन, असे विविध कार्यक्रम होणार असून, पुण्यासह कलाकार विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन सादरीकरण करण्यास सज्ज आहेत.
गायक जितेंद्र भुरुक म्हणाले की, दोन वर्षांनंतर 'दिवाळी पहाट'चे कार्यक्रम रंगणार असून, यंदा सारसबागेसह विविध ठिकाणच्या 'दिवाळी पहाट'मध्ये गायन सादर करणार आहे. या वर्षीची दिवाळी आम्हा गायकांसाठीही दिवाळी खास ठरणार आहे.
नृत्यदिग्दर्शक जतीन पांडे म्हणाले, दिवाळीनिमित्त नृत्याचे कार्यक्रमही होणार असून, तयारीही सुरू झाली आहे. पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कलाकार सादरीकरण करणार असल्याने कलाकारांमध्ये उत्साह आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजक सुनील महाजन म्हणाले की, यंदा मोठ्या प्रमाणात 'दिवाळी पहाट'चे कार्यक्रम रंगणार असून, त्यासाठी गायक आणि वादक मिळणेही कठीण झाले आहे. 'दिवाळी पहाट'च्या कार्यक्रमात दिग्गज गायक आणि वादक सादरीकरण करणार असून, विविध संस्थांची काही दिवसांपूर्वीपासून यासाठीची तयारी सुरू आहे.
यंदा दिवाळीला 'दिवाळी पहाट'पासून ते विविध कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या नाट्यगृहांसाठी चांगले बुकिंग झाले आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसासाठी विविध संस्थांनी बुकिंग केले असून, दिवाळीला नाट्यगृहांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत.
– विजय शिंदे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर