बांगलादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी | पुढारी

बांगलादेशातून पुण्यात बनावट नोटांची तस्करी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या (एमआय) माहितीवरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बनावट नोटांचे बांगलादेश कनेक्शन उघड करताना 2 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. खडकी बाजार परिसरातील एका पानपट्टीचालकासह तिघांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 400 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

अतुलकुमार नरेशकुमार मिश्रा (वय 23, रा. शेवाळे टॉवर्स, खडकी बाजार), रवी उर्फ सूरज वीरेंद्र शुक्ला (वय 35, रा. नवा बाजार, खडकी), राजूलकुमार उर्फ गुड्डू भाई राजबहाद्दूर सेन (वय 46, रा. लेक व्ह्यू सिटी, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

संशयित आरोपी अतुलकुमार याची खडकी बाजार परिसरात पानपट्टी आहे. आरोपी रवी शुक्ला अतुलच्या ओळखीचा आहे. तो अतुल याच्या पानपट्टीत काम करत होता. शुक्ला याच्याकडे बनावट नोटा होत्या. दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा वितरित केल्यास 30 हजार रुपये मिळतील, असे रवीने अतुलला सांगितले होते. त्यानुसार अतुल दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खडकी बाजार परिसरातून निघाला होता. एलफिन्स्टन रोडवर तो येणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यानंतर याबाबतची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला देण्यात आली. त्यानंतर एलफिन्स्टन रोडवर सापळा लावून अतुलला पकडण्यात आले.त्याने दिलेल्या माहितीवरून राजूलकुमारला ताब्यात घेण्यात आले. बनावट नोटा वितरित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुख्य सूत्रधार गुड्डू
पोलिसांनी या प्रकरणात पकडलेला गुड्डू हा गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून, त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात गुड्डूने या बनावट नोटा कोलकाता येथून आणल्याचे समोर आले. बांगलादेशाच्या बॉर्डरवरून या नोटा आल्याचे त्याने सांगितले. त्याने या 2 लाखांच्या बनावट नोटा 26 हजार देऊन घेतल्या असल्याचे तपासात सांगितले. त्याला जेव्हा बनावट नोटांची आवश्यकता असते, तेव्हा तो बांगलादेश बॉर्डरवरील लोकांशी संपर्क साधून या बनावट नोटा तस्करी करून देशात आणत असल्याचे पोलिसांना सांगितले.

अटक करण्यात आलेल्या अतुल मिश्राच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरातून 100 रुपयांच्या पंधरा बनावट नोटा, 100 रुपयांच्या नोटांचे कलरप्रिंट असलेले 19 पेपर, तीन कलर पेन आणि पेपर, तसेच कटिंग करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर रवी शुक्लाच्या घरची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरातून दोन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यातील एक नोट 200 ची आणि दुसरी नोट 500 ची आहे.

Back to top button