परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, सोयाबीन, भात, बाजरीचे नुकसान | पुढारी

परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, सोयाबीन, भात, बाजरीचे नुकसान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जाता जाता परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात धूमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. कापूस, सोयाबीन, भातपिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून, खरिपाचा बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. पुढील काही दिवस परतीचा पाऊस उच्छाद मांडणार असल्याने शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.

राज्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सुमारे 27 लाख हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत. त्यात सोयाबीन आणि बाजरी पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. काही भागात भाताच्या पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सोयाबीनच्या पेरणीने आजवरचे उच्चांक मोडीत काढत 48 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणीही सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे शेंगातून कोंब फुटण्याची स्थिती काही भागात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक

शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास काही जिल्ह्यात हिरावून घेतल्याचे चित्र आहे. शिवाय सोयाबीनची प्रत खालावण्याची दाट शक्यता असल्याचे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे. बाजरी पिकाचेही नुकसान झालेले आहे.  राज्यात खरीप हंगामात सुमारे 146 लाख हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. राज्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे  सुमारे 27 लाख हेक्टरवरील प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी ही पिके बाधित झाली आहेत, अशा आशयाचा अहवाल कृषी आयुक्तालयाने शासनास पाठविला असल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले.

शेतकर्‍यांकडून पीक नुकसानीच्या शासनास 40 लाख तक्रारी
ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. पिकांचे नुकसान झाल्याच्या सुमारे 40 लाख सूचना शेतकर्‍यांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 30 लाखांहून अधिक सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार नुकसानीपोटीची विमा रकमेची माहिती संकलित करण्याचे काम विमा कंपन्यांकडून सुरू आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडे एकूण 20 लाख तक्रारी प्राप्त झालेल्या असून, 6 लाख सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यापोटी शेतकर्‍यांना 645 कोटींची नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच अन्य कंपन्यांकडूनही नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

शुक्रवारी (दि.14) विमा योजनेतील सहभागी कंपन्यांबरोबर बैठक घेण्यात आली आहे. त्यांना तत्काळ सर्व सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचनांनुसार संबंधित शेतकर्‍यांना पीक नुकसानीपोटी विम्याच्या रकमा बँक खात्यावर जमा करण्यासही सांगण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वी सुमारे दीड हजार कोटींचे शंभर टक्के वाटप होण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकर्‍यांना भरपाईपोटी अडीच ते तीन हजार कोटी रुपये विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहेत. त्यापैकी दिवाळीपूर्वी सुमारे दीड हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्याची माहितीही धीरज कुमार यांनी दिली.

पुणे शहरात दोन तासांत  74 मिमी पाऊस
शहरात शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सर्वच भागांत दाणादाण उडाली. अनेक भागांतील घरांत, दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दोन तासांत 74.3 मिलिमीटर पाऊस झाला. पुढील पाच दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

Back to top button