पुणे : जलजीवन मिशनच्या 1654 योजना प्रस्तावित | पुढारी

पुणे : जलजीवन मिशनच्या 1654 योजना प्रस्तावित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनअंतर्गतची कामे सुरू आहेत. एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत 1 हजार 654 योजना प्रस्तावित आहेत. हे काम मूळ उद्दिष्टापैकी 67.55 टक्के एवढे आहे. आत्तापर्यंत एकूण निधीतील 69 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. कामाचा वेग समाधानकारक नसल्याने राज्य शासनाकडून वारंवार कामाचा वेग वाढविण्याबाबत जिल्हा परिषदेला सूचना केल्या जात आहेत. चालू वर्षी 63 हजार 673 कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यापासून 1 हजार 54 योजनांचा आराखडा तयार करून प्रस्तावित केला आहे. 2024 पर्यंत सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी 996 कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी या वर्षी 171 कोटी रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत.

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत आहे. शहराच्या बरोबरीने सर्व सुविधा आता ग्रामीण भागामध्ये मिळत असल्याने ग्रामीण लोकांचे राहणीमान देखील उंचावले आहे. त्यामुळे दरडोई पाण्याच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी हे नळाद्वारे देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

नवीन कामांबरोबरच जुन्या योजनांद्वारे प्रतिमाणसी 40 लिटर पाणी देण्यासाठी त्यांचीही देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामध्ये काही बदल करण्याचे देखील कामे होणार आहेत. जुनी योजना असली तरी त्याद्वारे जलजीवनच्या निकषानुसार पाणीपुरवठा होईल.
        – प्रकाश खताळ, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प.

Back to top button