इंदापूर : लुमेवाडी येथील जोधपुरी बाबांचा सोमवारपासून उरुस | पुढारी

इंदापूर : लुमेवाडी येथील जोधपुरी बाबांचा सोमवारपासून उरुस

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: सर्वधर्मसमभावाचे प्रतीक गाजी ए-मिल्लत सुफी संत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा (रहे.) तीर्थक्षेत्र लुमेवाडी (ता. इंदापूर) यांचा 29 वा उर्स शरीफ सोमवार (दि. 17) ते बुधवार (दि. 19) यादरम्यान होणार आहे. यानिमित्त राज्यासह राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना जियारतला गोड जर्दा व डाळभाताच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यानिमित्त दर्गाहवर सुंदर, मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याचे दर्गाह व उरुस कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

तीर्थक्षेत्र लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील गाजी-ए-मिल्लत सुफी संत हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा (रहे.) यांच्या उरुसास हजरत सुफी वली चाँद पाशा (आवाटी), हजरत सुफी अरीफबाबा (मोमिनाबाद), हजरत यादअली साहब (छोटे बाबजी राजस्थान) यांच्या जेरे-ए निगरानी (मार्गदर्शनाखाली) होणार आहे. सोमवारी (दि. 17) सांगली व सोलापूर जिल्ह्यासह काझीगल्ली (अकलूज) येथून चार वाजता संदल मिरवणुकीने बाबांच्या मजार शरीफवर चढवून प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवारी (दि. 18) मुख्य दिवशी संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध कव्वाल ‘आज तकदीर सवारने दो‘ फेम हाजी आझीम नाझा (मुंबई) व टीव्ही स्टार बशीर सासरी (कर्नाटक) यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार आहे. बुधवारी (दि. 19) सकाळी 8 वाजता जियारतचा गोड जर्दाचे वाटप करून उरुस पार पडणार आहे.

उरसानिमित्त आलेल्या लाखो भाविकांना डाळभाताचे लंगरखाना (महाप्रसाद) वाटप दुपारी 4 वाजेपासून हजरत फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा यंग ग्रुप व दर्गाह बांधकाम कमिटीच्या वतीने देण्यात येणार आहे. उरसानिमीत्त भाविकांना इंदापूर व अकलूज आगाराने एस.टी. बसची सोय करण्याची मागणी नागरिक व भाविकांनी केली आहे. यासह तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील भाविकांनी केली आहे.

 

Back to top button