शेळगाव : ठेकेदाराच्या सवडीनुसार चौपन्न फाटा रस्ता काम; रस्त्यावर खडी टाकल्याने प्रवाशांची कसरत | पुढारी

शेळगाव : ठेकेदाराच्या सवडीनुसार चौपन्न फाटा रस्ता काम; रस्त्यावर खडी टाकल्याने प्रवाशांची कसरत

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: सवडीनुसार काम करीत असल्याने नागरिक, प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना या उखडलेल्या रस्त्यावर पसरलेल्या मोठमोठ्या खडीमुळे प्रवास मोठ्या कसरतीसह करावा लागत आहे. इंदापूर-बारामती संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील चौपन्न फाटाहून तेलओढामार्गे शेळगावला जोडणारा हा रस्ता असून, त्याच्यासाठी निधीमंजूरीनंतरही संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले नव्हते.

मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेबदल दैनिक ‘पुढारी’ने बातमी प्रसिद्ध केल्यावर काम सुरू केले. मात्र, सध्या तो रस्ता पूर्णपणे उखडलेला असून, त्यावर मोठमोठी खडी पसरली आहे. पुढील काम ठेकेदाराने बंद ठेवले आहे. परिणामी, सध्या या रस्त्यावरील खडीतून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. सर्वांची मोठी कसरत होत असून, खडीवरून घसरून अपघातही होत आहेत.

बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष
बंद कामासंदर्भात इंदापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना कल्पना देऊनही ते ठेकेदारावर कारवाई करीत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी त्वरित ठेकेदाराला सांगून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

Back to top button