इंदापूर : साखर कारखान्यांनी थकित बिले दिवाळीपूर्वी द्यावीत: रासपचे महादेव जानकर यांचा इशारा | पुढारी

इंदापूर : साखर कारखान्यांनी थकित बिले दिवाळीपूर्वी द्यावीत: रासपचे महादेव जानकर यांचा इशारा

इंदापूर; पृढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे अद्यापपर्यंत शेतकर्‍यांची बिले अदा केलेली नाहीत. ती दिवाळीपूर्वी तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावीत; अन्यथा रासपकडून दिवाळी साखर कारखानदारांच्या दारात साजरी करू, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे. इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बाबीरगढ (रुई) येथे बुधवारी (दि. 12) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

जानकर म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील श्री बाबीरगढ हे धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे. ‘क‘ वर्गातील हे देवस्थान ‘ब‘ वर्गात आणायचे आहे. रस्ते मोठे करायचे आहेत; मात्र या ठिकाणचे काही शेतकरी रस्त्याकडेनी चारीसुद्धा खोदू देत नाहीत. गावात रस्ता चांगला झाला तर गावाची प्रगती होते. मात्र आपण जर डांबरीवरच ऊस लावायला सुरवात केली तर कसे होणार असे म्हणत अशा शेतकर्‍यांचा जानकर यांनी भरसभेत समाचार घेतला. शेतकर्‍यांच्या प्रश्नासोबतच उजनीवर त्यांनी भाष्य केले.

उजनी जलाशयामध्ये कुरकुंभ, रांजणगाव व औद्योगिक वसाहतीतील पाणी सोडल्याने पाण्याचा विषय गंभीर बनला असून त्याबाबतदेखील रासप लवकरच लढा उभारणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, माऊली सलगर, अजित पाटील, किरण गोफणे, पंडित घोळवे, भाऊसाहेब वाघ, संजय माने, तानाजी शिंगाडे, सतीश शिंगाडे, तानाजी मारकड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूरचा पुढील आमदार रासपचाच
रुई येथील बाबीरगडावर विकासकामांची माहिती घेताना या विकासासाठी कोणी निधी दिला हे कार्यकत्र्यांकडून जाणून घेत असताना कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 75 लाख रुपयांचा आराखडा तयार केल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी येथील सभामंडप दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनीही सभामंडपासह विकासकामास निधी दिला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी किती निधी दिला, असे विचारल्यानंतर कार्यकर्त्यांनी काही नाही, असे सांगितल्यावर जानकर म्हणाले, राजकारणात दुजाभाव करून चालत नाही. मात्र इंदापूरचा पुढील आमदार हा रासपचाच असणार आहे आणि ते प्रवीण मानेदेखील असू शकतात. आपण त्यांना सहकार्य करू, असे वक्तव्य त्यांनी करताच कार्यकर्त्यांनीही त्याला प्रतिसाद देत जल्लोष केला.

 

Back to top button