पावसाने निमगाव केतकीत तरकारीचे नुकसान; तीन पुलाखालचा वेग वाढला | पुढारी

पावसाने निमगाव केतकीत तरकारीचे नुकसान; तीन पुलाखालचा वेग वाढला

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: मागील सलग चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे तर सलग चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. गावातील व परिसराच्या शेतातील शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांना या पावसाच्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला असून द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी पूर्णपणे मोडकळीस येण्याची भीती व्यक्त होत आहे.

गावातील चिंचेच्या आखाड्यानजीक तीनपुलाखाली पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने तात्पुरत्या स्वरूपात पाच गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांमधून पाणी वाहत आहे. यामध्ये मका पिकासह यामध्ये टॉमेटो व भाजीपाल्याच्या पिकालादेखील मोठा फटका बसला आहे. द्राक्ष पीक सध्या फुलोर्‍यात आहे.

त्यास बुरशीजन्य आजारांचा धोका पावसामुळे वाढला आहे. तर डाळिंब पिकास कुजवा, डांबर्‍या, करपा रोग बळावला असल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी सचिन शिंदे यांनी सांगितले. शेतातील टोमॅटो, गवार, मुळगुंड या उभ्या पिकात पावसाचे पाणी साचल्याने काढणीस आलेल्या भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे भारत शेंडे या शेतकर्‍याने सांगितले. 12 ऑक्टोबरला 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर 13 ऑक्टोबरला 18 मिलिमीटरची नोंद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच होता.

 

Back to top button