बारामती : शिवसेना संपविण्याचे पवारांचे स्वप्न पूर्ण : आमदार पडळकर | पुढारी

बारामती : शिवसेना संपविण्याचे पवारांचे स्वप्न पूर्ण : आमदार पडळकर

बारामती; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीसोबत जाणारे संपतात, त्यांची राख होते, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या बाबतीत पवारांनी आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. निवडणूक आयोग कोणताही दुजाभाव करत नाही. उलट शिवसेना- राष्ट्रवादीला एकत्र करून आयोगाने खंजीर हे चिन्ह द्यायला हवे होते, अशी खोचक टीका त्यांनी केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

शिवसेनेला मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला वेळ लागेल. त्याऐवजी या दोन पक्षांनी एकत्र येत खंजीर चिन्ह घ्यायला हवे होते. राष्ट्रवादीचा जन्मच खंजिरातून झाला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून या दोघांना खंजीर चिन्ह द्यायला हवे होते, असे पडळकर म्हणाले. अजित पवार यांनी केलेले बंड फसले. बंडानंतर अवघे दोन आमदार त्यांच्यासोबत राहिले. या उलट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करणार्‍या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदार गेले. त्यामुळे सरस कोण हा संदेश जनतेत गेला.

भाजपने मन मोठे करत मराठा समाजाचा मुख्यमंत्री केला. फसलेले बंड आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्री हेच पवार यांच्या दुखण्याचे मूळ असल्याचे आ. पडळकर म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघ यावेळी भाजपच जिंकेल. राष्ट्रवादीने कितीही वल्गना केल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आपला लोकप्रतिनिधी असावा, अशी जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसाठी आमची सेवा शक्ती संघर्ष संघटना कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून कर्मचार्‍यांचे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पवार यांच्या नेतृत्वातील संघटनांनी कर्मचारी हिताकडे दुर्लक्ष केले. फक्त राजकारणासाठी या संघटनांचा वापर झाल्याची टीका त्यांनी केली. अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु सरकारमध्ये असेपर्यंत त्यांना हे जमले नाही. त्यासाठी आमचे सरकार यावे लागले, असेही ते म्हणाले.

फडणवीस- जानकर निर्णय घेतील
बारामती लोकसभा लढविण्याचा निर्णय महादेव जानकर यांनी घेतला असल्याच्या प्रश्नावर आ. पडळकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष हा आमचा मित्रपक्ष आहे. घटक पक्षासंबंधी मी बोलू शकत नाही. परंतु यासंबंधी रासपचे संस्थापक महादेव जानकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रित बसून मार्ग काढतील.

महाविकास आघाडीने मराठा आरक्षण घालवले
मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे आरक्षण मिळाले होते. महाविकास आघाडी सरकारने ते घालवले. सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. आता या विषयावर विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही. काही तरी पसरवून ते तेढ निर्माण करत असल्याचे पडळकर म्हणाले.

Back to top button