कळंब परिसरात ढगफुटीसदृश पाऊस | पुढारी

कळंब परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

मंचर; पुढारी वृत्तसेवा: कळंब (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 13) दुपारी दोन ते तीन तास ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकेही सडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने शेतीमालाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे कित्येक शेतकर्‍यांच्या कांदा बराकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. कोथिंबीर, शेपू, मेथी, कोबी, फ्लॉवर, वांगी, ढोबळी, टोमॅटो, भेंडी या तरकारी मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांची कांदा आणि बटाटा लागवडदेखील वाया गेली आहे.

द्राक्ष बागायतदारांनी नुकतीच छाटणी केली होती. ही छाटणी सततच्या पावसामुळे वाया जाऊन मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागायतदारांचे सुद्धा नुकसान झाले आहे. परिणामी यंदाचा द्राक्ष हंगाम वाया जाणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, अर्जुन कानडे, अनिल कानडे, विनोद थोरात, तुषार थोरात, नीलेश कानडे, महेंद्रनाथ कानडे आदी शेतकर्‍यांनी सांगितले.

शाळेचे मैदान झाले शेततळे
सततच्या पावसामुळे कळंब जिल्हा परिषद शाळा आणि विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून मोठमोठी डबकी तयार झाली आहेत. या डबक्यांमुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या परीक्षा सुरू असल्याने शाळा परिसरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळेमध्ये फवारणी करणे गरजेचे असून पाणी साचू नये यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Back to top button