लोणी भापकर : वाकी धरण भरले; सतर्कतेचा इशारा | पुढारी

लोणी भापकर : वाकी धरण भरले; सतर्कतेचा इशारा

लोणी भापकर; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्याच्या जिरायत पट्ट्यातील वाकी येथील धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे ओढ्याला पूर आला आहे. त्यामुळे ओढ्याकाठच्या गावांतील शेतकर्‍यांना व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती वाकीचे सरपंच किसन बोडरे यांनी दिली. बारामती तालुक्यातील जोगवडी, मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, कानाडवाडी, वाकी, पळशी तसेच नावळी परिसरात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे वाकी धरण 100 टक्के भरले असून धरणातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे वाकी ओढ्याकाठच्या शेतकर्‍यांची पिके वाहून गेली असून, अनेकांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे.

जोगवडी, मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, कानाडवाडी, पळशी, वाकी आदी परिसरातील तळी, नाले भरून वाहत असल्याने ओढ्यांना पूर आला आहे. हे पाणी वाकीच्या धरणाला मिळते. त्यामुळे वाकीच्या धरणातून पाणी बाहेर पडले आहे. ओढा पात्राच्या बाहेर पाणी पडल्याने ओढ्याकाठच्या शेतातील बाजरी, मका, सोयाबीन, ऊस, चारापिके व तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. वाकी, पांढरवस्ती, चोपडज, वडगाव निंबाळकर आदी गावांना पुराचा फटका बसला आहे. धरणातील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने ओढ्याकाठच्या शेतकर्‍यांनी विशेषत: वाकी, पांढरवस्ती, चोपडज, वडगाव निंबाळकर या गावांतील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन सरपंच किसन बोडरे यांनी केले आहे.

Back to top button