पुणे : डीपीसीची 110 कामे रद्द; पंचायत विभागाच्या कामांची संख्या सर्वाधिक | पुढारी

पुणे : डीपीसीची 110 कामे रद्द; पंचायत विभागाच्या कामांची संख्या सर्वाधिक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून होणारी 110 कामे रद्द करण्यात आली आहेत. त्याचबरोबर 205 कामे ही स्थगित करावी लागली असल्याची माहिती समोर आली आहे. जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यासाठी हंड्रेड डेज योजनाही राबवली होती. त्यामाध्यमातून अधिकाधिक कामे करण्यावर जिल्हा परिषदेकडून भर देण्यात आला होता. 2021-22 मध्ये डीपीसीच्या माध्यमातून 6 हजार 392 विकासकामे मंजूर करण्यात आली होती.

त्यापैकी 2 हजार 665 कामे ही पूर्ण करण्यात आली आहेत. तर, सध्या 2 हजार 294 कामे सुरू आहेत. 205 कामांना स्थगिती देण्यात आली असून, 744 कामांसाठी एजन्सी म्हणून ग्रामपंचायतकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. तर, 110 कामे ही पूर्णपणे रद्द केली आहेत. जिल्हा परिषदेमध्ये नुकताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचा आढावा घेतला, त्या वेळी त्यांनाही जिल्हा परिषदेकडून माहिती सादर करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी जागांची अडचण असून, रद्द कामाच्या निधीतून नवीन कामांचे नियोजन करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या कामामध्ये सर्वाधिक 42 कामे ही पंचायत नागरी सुविधाची आहेत. समाजकल्याण विभागाची सर्वाधिक 1 हजार 432 कामे मंजूर करण्यात आली, त्यापैकी केवळ 2 कामे ही रद्द झाली आहेत. तर, 575 कामे अद्याप सुरू आहेत. बांधकाम विभागाची 612 कामे मंजूर झाली, त्यापैकी 308 कामे पूर्ण झाली; तर 244 कामे अद्याप सुरू आहेत. 31 कामे रद्द केली आहेत.

पशुसंवर्धन विभागाची केवळ 14 कामे मंजूर होती, त्यापैकी एकही काम पूर्ण झाले नसून, 11 कामे सुरू, तर 3 कामांना स्थगिती दिली आहे. महिला व बालकल्याणची 140 कामे मंजूर होती, त्यापैकी 15 कामे पूर्ण झाली, 56 सुरू आहेत, तर 10 रद्द केली आहेत. आरोग्य विभागाची 215 कामे मंजूर करण्यात आली, त्यातील केवळ 26 कामे झाली, तर 153 कामे ही सुरू असून, तीन रद्द केली.

सोमवारी होणार्‍या बैठकीत पुन्हा होणार आढावा
पालकमंत्री सोमवारी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत पुन्हा या सर्व कामांचा आढावा घेतला जाणार आहे. आणखी काही कामे या बैठकीत रद्द केली जातील, की कामे बदलून नव्याने केली जातील, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button