कोंढव्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार | पुढारी

कोंढव्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तरुणीच्या तोंडावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. राकेश सतीश आढाव (वय 32, रा. विमाननगर), मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्वउद्दीन खान (रा. औरंगाबाद), मोहम्मद शरीफनवाज सर्वरुद्दीन (वय 28, रा. औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत 37 वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार उंड्री येथील एका सोसायटीत 9 ऑक्टोबर रोजी दुपारी, 9 ते 11 ऑक्टोबर सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उंड्री येथील एका सोसायटीत रुम शेअर करून राहत आहेत. त्यांनी आपल्या रुमवर 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पार्टी ठेवली होती. त्यासाठी तरुणीची मैत्रीण व तिघे आरोपी मित्र हेदेखील तेथे होते. दरम्यान, पार्टी सायंकाळी असल्यामुळे तरुणी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आपल्या खोलीत दरवाजा पुढे करून झोपण्यासाठी गेली होती. त्या वेळी तिघांपैकी एका रुममेटने त्यांच्या तोंडावर गुंगीकारक स्प्रे मारला. त्यामुळे त्यांची शुद्ध हरपली.

त्यानंतर या तिघांनी त्या बेशुद्ध असताना त्यांच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या दीड दिवसांनी शुद्धीवर आल्या. त्यानंतर आपल्याबरोबर या तिघांनी काय केले, याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली़. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

Back to top button