पुणे : डोळ्यांच्या 17 लाख शस्त्रक्रिया मोफत होणार | पुढारी

पुणे : डोळ्यांच्या 17 लाख शस्त्रक्रिया मोफत होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मागील दोन वर्षांत कोरोनामुळे डोळ्यांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. प्रतिबंधात्मक अंधत्वमुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत वर्षभरात डोळ्यांच्या 17 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये मोतीबिंदूसह काचबिंदू, स्क्विंट आणि रिफ्रॅक्टरी एरर या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. दर वर्षी संपूर्ण राज्यात किमान 6-7 लाखांहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत असत. मात्र, साथीच्या काळात केवळ दोन लाखच शस्त्रक्रिया झाल्या.

यातील मनुष्यबळ कोरोना रुग्णसेवेसाठी नियुक्त करण्यात आले होते. अभियानसाठी जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे नेत्रविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने समन्वय पाहणार आहेत. राज्याचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागासोबतच आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागही अतिरिक्त सहकार्य करतील.

राज्यातील नागरी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि इतर आरोग्य विभागातील पायाभूत सुविधा ज्या डोळ्यांशी संबंधित उपचार देऊ शकतील, अशा 350 हून अधिक ऑपरेशन थिएटरचे चॅनेलाइजेशन करून राज्य ही योजना सुरू करणार आहे. या वर्षभरात डोळ्यांच्या सुमारे 17 लाखांहून जास्त मोफत शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत राज्यातील 350 हून अधिक ऑपरेशन थिएटर्स, सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालये चॅनेलाइज करण्यात येणार आहेत. डोळ्यांचे उपचार देणार्‍या स्वयंसेवी संस्थांनाही यात सहभागी करून घेतले जाईल. अन्य विभागांच्या सहकार्याने पुढील दोन वर्षांत या प्रलंबित शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जातील आणि पूर्ण होतील.
                                     – डॉ. तात्याराव लहाने, नेत्रविज्ञान विभाग
                                                        प्रमुख, जे. जे.

Back to top button