पुणे: ऊस तोडणी मजुरांनी घातला चार कोटींचा गंडा, ‘सोमेश्वर’सह, दत्त शुगरला टोळ्या पोहोचल्याच नाहीत | पुढारी

पुणे: ऊस तोडणी मजुरांनी घातला चार कोटींचा गंडा, 'सोमेश्वर'सह, दत्त शुगरला टोळ्या पोहोचल्याच नाहीत

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा: ऊस गळीत हंगाम सुरु होण्याच्या तोंडावर राज्यातील ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या टोळ्यांनी वाहतुकदारांना तब्बल चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व फलटण तालुक्यातील श्री दत्त शुगर या कारखान्यावरील ऊसतोड करणाऱ्या जवळपास चाळीस टोळ्यांनी ट्रक, ट्रॅक्टर ऊस वाहतुकदारांना तब्बल चार कोटी रुपयांचा गंडा घालत पलायन केल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपूर्वीही बारामती तालुक्यातील अनेक वाहतुकदारांना ऊसतोडणी मजुरांनी करोडो रुपयांना गंडा घातला होता. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊसतोडणी मजुरांनी पळ काढल्याने वाहतूकदार अडचणीत आले आहेत.

राज्य शासनाने १५ ऑक्टोबर पासून राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता कारखादारांनी कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पूर्ण केली आहेत. तसेच ऊस तोडणी यंत्रणेबाबत देखील करार पूर्ण केले आहेत. मात्र परतीच्या पावसाने ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दररोज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४२ हजार एकरांवरील १६ लाख टनाच्या आसपास गाळापासाठी ऊस उपलब्ध आहे. गेल्याच वर्षी सोमेश्वर कारखान्याने कारखान्याचे विस्तारीकरण केल्याने यावर्षी वेळेत ऊस गाळपाचा मार्ग काहीसा सुकर होणार आहे.

कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्यासाठी कारखान्याने ४३६ ट्रक- ट्रॅक्टर, ८६० बैलगाडी, २६९ डंपींग आणि १३ हार्वेस्टरशी करार केले असून सर्वांना आगाऊ रकमा दिल्या आहेत. सोमेश्वरने ४३६ ट्रक -ट्रॅक्टर वाहतुकदारांशी करार करत प्रत्येक वाहनाला ५ लाखांची उचल दिली आहे. ऊस वाहतूकदार यामध्ये पदरचे ५ लाख ते १२ लाख रुपये टाकून पुढे ऊसतोड टोळ्यांशी करार केले आहेत.

करारानंतर या टोळ्यांनी कारखान्यावर येणे अपेक्षित होते. परंतु बीड व चाळीसगाव येथील ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या इकडे पोहोचलेल्या नाहीत. त्यांचा तपास लागत नसल्याने वाहतूकदार हवालदील झाले आहेत. कारखान्याने दिलेल्या उचलीमध्ये पदरचे सात ते बारा लाख बँकांचे अथवा पतसंस्थाचे कर्ज काढून वेळप्रसंगी सोने गहाण ठेवून ऊसतोडणी टोळ्यांशी करार केले तरच ऊस तोडण्यासाठी कामगार मिळतात. सध्या फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनीही जमेल त्या मार्गाने पैसे जमा करत तोडणी टोळ्यांना देत रिसरत करार केले होते. परंतु आता टोळ्याच पळून गेल्याने त्यांना डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.

सोमेश्वर व फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील श्री दत्त शुगर कारखान्याच्या देखील ऊस वाहतुकदारांचा यामध्ये समावेश आहे. ऊस हंगाम जवळ आल्याने वहातुकदारांनी ऊसतोड टोळ्यांना फोन केले असता ते बंद लागल्याने वाहतुकदारांनी ऊसतोड टोळ्यांतील मजुरांची घरे गाठली. मात्र तिथेच कोणीच आढलले नाही. तेथून त्यांनी पलायन केल्याचे समजले. हे मजूर अन्य राज्यात ऊसतोडणीसाठी गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारखाना कागदोपत्री करार पूर्ण करतो. परंतु टोळ्या पळून गेल्यानंतर न्यायालयात धाव घ्यावी लागते. न्यायालयीन प्रक्रियेत मोठा वेळ जातो. वाहतूकदार टोळी मुकादमांना पैसे देतात. यात तोडणी मजुरांचा जास्त संबंध येत नाही. परंतु आता मुकादमच घर सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे वाहतूकदार अडचणीत आले आहेत. राज्यात दरवर्षी कुठे ना कुठे असे प्रकार घडतात. त्याला पायबंद घालण्यासाठी साखर कारखाना व साखर संघाने यातून मार्ग काढावा.
– माऊली कदम, ऊस वाहतुकदार, सोमेश्वर कारखाना.

Back to top button