

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मार्केट यार्डात होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी असलेली साप्ताहिक सुटी बदलून ती सोमवारी करण्यात यावी, असा निर्णय बाजार समिती प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आल्यापासून फळे, तरकारी, कांदा-बटाटा विभागास शनिवारी साप्ताहिक सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, गेल्या काही वर्षांत शहराची वाढ होण्यासह बाजार आवारात शेतमालाची आवकही वाढत आहे. दरम्यान, रविवारनंतर सोमवारी बाजारातील आवक अवघी 25 टक्केच होत असल्याने प्रशासनाने साप्ताहिक सुटी बदलाच्या अनुषंगाने नियोजन सुरू केले.
खरेदीदारांपासून कामगारांपर्यंत सर्वांना सोयीस्कर ठरेल या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला आहे. परवानगीनंतर प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यानंतर, त्यातील बदल जाणून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.प्रशासनाच्या या निर्णयामुळे बाजार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बाजार आवार हा दिवसभर सुरू नसतो. त्यामुळे, अन्य दिवशीही बाजार घटकांना त्यांची कामे पार पाडता येऊ शकतात. शनिवार ऐवजी सोमवारी साप्ताहिक सुटी बदलून काही साध्य होणार नाही. प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा.
– अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन.बाजार आवारात 27 संघटना कार्यरत असून, साप्ताहिक सुटी ही शनिवारीच असावी, या भूमिकेवर बाजार घटक ठाम आहे. त्यामुळे, अडते असोसिएशनचीही हीच भूमिका आहे. साप्ताहिक सुटीदिवशी मुलांनाही सुटी असल्याने यादिवशी बाजार घटकांना पूर्ण वेळ त्यांच्या कुटुंबीयांना देता येतो. प्रशासनाने जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेल्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.
– अनिरुद्ध भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन.