आंबेगावतील अनेक ग्रा.पं.मध्ये भ्रष्टाचार; सरपंच झाले ठेकेदार; निकृष्ट, अपूर्ण कामांची होतात पूर्ण बिले | पुढारी

आंबेगावतील अनेक ग्रा.पं.मध्ये भ्रष्टाचार; सरपंच झाले ठेकेदार; निकृष्ट, अपूर्ण कामांची होतात पूर्ण बिले

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशीही नीट होत नाही. हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या पंचायत प्रशासन विभागाने लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी प्रत्यक्ष ग्रामपंचायत खात्यात जमा होतो.

अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी पंचायतीच्या आडून ठेकेदारी करत आहेत. कामे निकृष्ट दर्जाची होतात. ग्रामपंचायतींना मिळालेल्या कामाची एजन्सी स्वतः ग्रामपंचायत असल्याने फेरनिविदा न काढता दरपत्रकानुसार कामे पूर्ण केली जातात. या उलाढालींबरोबरच अनेक भ्रष्टाचाराच्या घटना आणि गुंतलेली रक्कम यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करूनही अद्याप निर्णय नाही.

ग्रामस्थांनी उपोषण करूनही आश्वासनापलीकडे काहीच झाले नाही. उलट परिपत्रकास संबंधित ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. परिणामी मागील महिन्यात या प्रकरणांमध्ये झाली. दरवर्षी ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होते. मात्र दुय्यम दर्जाचे नियुक्त अधिकारी लेखापरीक्षण व दफ्तर तपासणी करताना भ्रष्टाचार झाल्याचे का दिसत नाही? का त्यांचीही भ्रष्टाचाराला मूक अनुमती आहे?

अशी चर्चा होत आहे. काही ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचाराबाबत चौकशी अहवाल देऊनही तालुकास्तरावरून कारवाई नाही. तत्कालीन गटविकास अधिकारी गुन्हा दाखल करत नाहीत, त्यामुळे ही कारवाई त्वरित करा, अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी निर्मूलन न्यासाच्या वतीने केली आहे.

Back to top button