निरा : बुवासाहेब ओढ्याच्या बाह्य पुलावरून वाहिले पाणी | पुढारी

निरा : बुवासाहेब ओढ्याच्या बाह्य पुलावरून वाहिले पाणी

निरा; पुढारी वृत्तसेवा: निरा व परिसराला मंगळवारी (दि. 11) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासूून बुवासाहेब ओढ्याला पाणी आले. या बाह्य वळणावरील पुलावरून पाणी वाहून गेल्याने पूल खचला. दरम्यान सातारा- नगर आणि निरा- बारामती मार्गावरील वाहतूक बुधवारी (दि. 12) सकाळी 10 वाजेपर्यंत ठप्प झाल्याने दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. निरा (ता. पुरंदर) व परिसरातील गुळूंचे, कर्नलवाडी, राख, पिंपरे खुर्द आदी भागास मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुसळधार पावसाने सुमारे दीड तास झोडपले.

त्यानंतर बुधवारी पहाटेपर्यंत कमी- अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. या पावसाची 66 मिलिमीटर नोंद झाली आहे. त्यामुळे राख, गुळूंचे परिसरातील ओढ्याचे पाणी बुवासाहेब ओढ्यात आल्याने ओढ्याच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. निरा गावाच्या शिवेवरून वाहणार्‍या बुवासाहेब ओढ्यावरील नवीन पुलाचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे संथगतीने सुरू आहे. त्यावेळी ओढ्याच्या पुलाजवळ बाह्य वळणावर तीन सिमेंटचे पाइप टाकून वाहतुकीकरिता तकलादू पूल तयार केला.

बुधवारीही मोठ्या प्रमाणात या पुलावरून पाणी वाहून गेले. त्यामुळे तो पूल दोन्ही बाजूने खचला. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी (दि. 12) सकाळी ठेकेदाराने खचलेल्या पुलावर मुरमाने डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. परंतु बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाने तब्बल दीड तास जोरदार हजेरी लावल्याने रस्ता चिखलमय झाला. त्यामुळे बाह्य वळणावरील पुलावरून ये-जा करणार्‍या वाहनांस मोठी कसरत करावी लागली.

विद्यार्थ्यांना मनस्ताप
निरा व परिसरातील हजारो विद्यार्थी तसेच शिक्षक सोमेश्वरनगर, माळेगाव, बारामती येथील विविध महाविद्यालयांत शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. त्यांना बुवासाहेब ओढ्यावरील पुलावरूनच ये-जा करावी लागते. मागील महिन्यात पूर आल्याने दोन ते तीन दिवस वाहतूक बंद होती. त्यातच बुधवारी पुन्हा पूल बंद असल्याने शाळा, महाविद्यालयात जाण्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. सध्या शाळा, महाविद्यालयांत परीक्षेचा काळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांना मनस्ताप सोसावा लागला.

 

Back to top button