शिरूरचा पाणीपुरवठा खंडित; वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेमध्ये वारंवार बिघाड | पुढारी

शिरूरचा पाणीपुरवठा खंडित; वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेमध्ये वारंवार बिघाड

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: शिरूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या हत्ती डोह पंपिंग स्टेशनच्या वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेमध्ये होणार्‍या वारंवार बिघाडामुळे शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांनी तीव नाराजी व्यक्त केली. भरपूर पाऊस होऊन घोडनदी दुथडी भरून वाहत असताना वारंवार या बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित होत आहे. मागील काही महिन्यांपासून बिघाडाच्या या घटना सतत घडल्या आहेत. कधी हत्ती पंपिंग स्टेशनची मोटार बिघडणे, तारा तुटणे, केबल खराब होणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत.

शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या पुढे गेली आहे. शहराला नियमित पाणीपुरवठा होणे हे गरजेचे असताना या प्रकारामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पंपिंग स्टेशनला महावितरण वीज पुरवठा करते. महावितरणने वेगळा फिडर यासाठी दिला असून त्यासाठी एचटी लाइन दिली आहे. रोज 72 लाख लिटर पाणी पूर्ण क्षमतेने चालू असून या सर्व इलेक्ट्रिक लाइन देखभाल दुरुस्ती ही महावितरण करते, असे पाणीपुरवठा प्रमुख शिरूर नगरपरिषद भगवान दळवी यांनी सांगितले.

शिरूर नगरपरिषदेच्या हत्ती पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा हा एक्स्प्रेस फिडरवर असून एक वर्षानंतर केबल खराब झाली असून, ती दुरुस्त करण्यासाठी पुण्याहून साहित्य आणावे लागते. त्यासाठी वेळ लागतो. शिरूर नगरपरिषदेच्या फिल्टर प्लॅट हा एक्स्प्रेस फिडरवर घेण्यासाठी सर्व्हे झाला होता. मात्र अंतर जास्त असल्याने तसेच काही अडचणीमुळे हे राहून गेले असून, त्यासाठी नवीन मंजुरी घेऊन सर्व्हे करावा लागेल, मात्र लवकरात लवकर हे काम होईल.
                         – एम. एस. बेसुर्डे, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी

वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याला वीज वितरण कंपनी दोषी आहे. शहरात वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा, यामुळे फिल्टर प्लॅट हा एक्स्प्रेस फिडरला जोडावा यासाठी मी स्वतः पाणीपुरवठा सभापती असताना 2020 रोजी पत्र दिले होते. मात्र त्यावर वीज वितरण कंपनीने काहीच केले नाही. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम वीज वितरण कंपनीने केले आहे.
                       – मुज्जफर कुरेशी, माजी सभापती, पाणीपुरवठा शिरूर नगरपरिषद

Back to top button