‘वायसीएम’मधील एनआयसीयू फुल्ल दुसरे एनआयसीयू कुलूपबंद ; नवजात बालकांसाठी अपुरी जागा | पुढारी

‘वायसीएम’मधील एनआयसीयू फुल्ल दुसरे एनआयसीयू कुलूपबंद ; नवजात बालकांसाठी अपुरी जागा

दीपेश सुराणा : 

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी तळमजल्यावर सुरू असलेल्या एनआयसीयूमधील सर्व खाटा सध्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे अन्य खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असलेल्या नवजात बालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावयाचे झाल्यास त्यांना 1 ते 2 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या जुन्या एनआयसीयूमध्ये वैद्यकीय साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे हे एनआयसीयू सध्या वापराशिवाय पडून आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणी शस्त्रक्रिया वॉर्ड तयार करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे.

खाटा पडताहेत अपूर्ण
अन्य रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये हलवायचे असल्यास, त्यासाठी 10 खाटा ठेवण्यात आल्या आहेत. तर, रुग्णालयातच जन्म झालेल्या नवजात बालकांना उपचारासाठी एनआयसीयूमध्ये ठेवायचे असल्यास त्यासाठी 15 खाटांची सोय केलेली आहे. अशा एकूण 25 खाटांची या एनआयसीयूमध्ये सोय आहे. कावीळ, न्यूमोनिया, वजन कमी झालेले नवजात बालक यांच्यावर येथे उपचार केले जात आहेत. एक महिन्याच्या आतील नवजात बालकांवर येथे उपचार केले जातात. वायसीएममध्ये यापूर्वी चौथ्या मजल्यावर कार्यरत असलेल्या एनआयसीयूमध्ये केवळ 15 खाटांची सोय होती. दरम्यान, नवीन एनआयसीयूमध्ये अधिकच्या 10 खाटांची सोय झाली आहे. मात्र, वायसीएम रुग्णालयावर पडत असलेला अतिरिक्त रुग्णसेवेचा ताण लक्षात घेता या खाटादेखील अपूर्ण पडत आहेत.

सध्याच्या एनआयसीयूमध्येच बेड वाढविणे शक्य
सध्या उपलब्ध असलेल्या एनआयसीयूमध्येच आणखी 8 ते 10 खाटा वाढविता येऊ शकतात. मात्र, या खाटांवर उपचारासाठी येणार्‍या नवजात बालकांची देखरेख व उपचारासाठी 14 परिचारिकांची गरज लागणार आहे किंवा आहे त्याच परिचारिकांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

जुने एनआयसीयू कुलूपबंद
चौथ्या मजल्यावर असलेले जुने एनआयसीयू सध्या कुलूपबंद आहे. या एनआयसीयूमध्ये जंबो कोवीड रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य ठेवण्यात आले आहे. संबंधित एनआयसीयूमधील टाईल्स निघाल्या आहेत. तसेच, भिंतीवरील टाईल्सदेखील उखडल्या आहेत. या वॉर्डाची डागडुजी करून तेथे तात्पुरत्या स्वरुपात शस्त्रक्रिया वॉर्ड सुरू करण्याचे नियोजन आहे. सहाव्या मजल्यावरील शस्त्रक्रिया वॉर्डाचे नूतनीकरण केले जाणार आहे. तोपर्यंत हा वॉर्ड जुन्या एनआयसीयूमध्ये हलविण्यात येणार आहे.

वायसीएममधील एनआयसीयूमध्ये रुग्णालयात जन्म झालेल्या नवजात बालकांना उपचारासाठी पहिले प्राधान्य दिले जाते. खासगी रुग्णालयातून येथील एनआयसीयूमध्ये नवजात बालकांना उपचारासाठी हलवायचे असल्यास त्यासाठी मात्र, एक ते दोन दिवसांचा वेटिंग पीरियड आहे. रुग्णालयात सध्या असलेल्या एनआयसीयूमध्येच 8 ते 10 खाटा वाढविता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी 14 स्टाफ नर्सची नियुक्ती करावी लागणार आहे.
          – डॉ. राजेंद्र बावळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय व पदव्युत्तर संस्था.

Back to top button