पुणे : गज्या मारणेसह साथीदारांना आश्रय देणार्‍यांनाही मोक्का; पोलिस आयुक्त गुप्तांचा इशारा | पुढारी

पुणे : गज्या मारणेसह साथीदारांना आश्रय देणार्‍यांनाही मोक्का; पोलिस आयुक्त गुप्तांचा इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील 14 जणांवर पुणे पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गज्या मारणे व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. त्यामुळे या गुंडांना आश्रय देणारे, साहाय्य करणारे, आर्थिक मदत करणारे कोणी आढळून आल्यास त्यांच्यावरही मोक्का कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करून एका व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. मूळचे सांगलीचे असणारे व सिंहगड रोडवर राहणारे फिर्यादी यांचा रिअल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सांगलीच्या हेमंत पाटील याने त्यांच्याकडे 4 कोटी रुपये गुंतवणूकीसाठी दिले होते. तोटा झाल्याने ते पैसे देऊ शकत नव्हते. तेव्हा हेमंत पाटील व गज्या मारणे टोळीने त्यांचे अपहरण करून 20 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. खंडणी विरोधी पथकाने त्यातील चौघांना अटक केली आहे.

बाहेर आल्यानंतर खंडणीचा प्रकार
पोलिसांनी 14 जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे.तळोजा कारागृहातून सुटल्यावर गज्या मारणे आणि त्याच्या टोळीने मुंबई-पुणे महामार्गावर रॅली काढून दहशत माजविली. त्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हा मारणे फरार झाला होता. तेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला सातारा येथून अटक केली होती. मार्च महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर खंडणीचा हा प्रकार समोर आला आहे.

Back to top button