पुणे : दिलासादायक! सक्रिय रुग्णसंख्या आटोक्यात | पुढारी

पुणे : दिलासादायक! सक्रिय रुग्णसंख्या आटोक्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा:  कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साह पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 500 पर्यंत खाली आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच पुणे हॉटस्पॉट ठरले आहे. अगदी चौथ्या लाटेमध्येही पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. सध्या मुंबईमध्ये 948, पुण्यात 515, ठाण्यामध्ये 365 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.

उर्वरित सर्व जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णसंख्या 100 पेक्षा खाली आली आहे. धुळे आणि परभणीमध्ये सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 12 ऑक्टोबरच्या अहवालानुसार, राज्यात 2455 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी 476 नवीन रुग्णांचे निदान झाले, तर 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 404 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के इतके आहे, तर मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे. सध्या स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button