पुणे: जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात १९ वर्षाच्या तरुणीचा मृत्यू | पुढारी

पुणे: जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात १९ वर्षाच्या तरुणीचा मृत्यू

पिंपरखेड (पुणे), पुढारी वृत्तसेवा : जांबुत (ता. शिरूर) येथे पुजा भगवान नरवडे या १९ वर्षाच्या तरूणीवर घरासमोर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. तसेच तिला २०० फूट ओढत नेले. बिबट्याने तरुणीचा गळा पकडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, जांबुत येथील जोरीमळा येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुजा ही काही कामासाठी बाहेर आली. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने पुजावर झडप मारून मानेला पकडून ओट्यावरून तिला शेजारील उसाच्या शेतात 200 फुट अंतरावर ओढत नेले. तिच्या आईने आरडाओरडा केल्यावर लगेचच शेजाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी बिबट्याने पुजाला तेथेच सोडून पळ काढला. परंतु बिबट्याने थेट तिच्या मानेला पकडल्याने गंभीर जखमी झालेल्या पुजाचा जागेवरच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र कर्मचा-यांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली.

जांबुत येथे हल्ल्याची ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. पिंजरे लावूनही नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश आले आहे. त्यामुळे वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहे अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्‍थांकडून व्यक्‍त केली जात आहे.

यापूर्वी तरुणाचा गेला होता बळी 

दरम्‍यान, जांबूत येथील सचिन जोरी या तरुणाचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गावातील पुजा भगवान नरवडे या तरूणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने जांबूत गावात भीतीचे वातावरण परसले आहे. मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला होता. जांबूत, पिंपरखेड परिसरात या बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून आत्तापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे ३ जणांचे मृत्यू झाल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आवाहन वनविभागापुढे उभे आहे.

Back to top button