पुणे : कोरोनानंतर वाढल्या ‘अँजिओप्लास्टी’ | पुढारी

पुणे : कोरोनानंतर वाढल्या ‘अँजिओप्लास्टी’

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळानंतर हृदयविकाराच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हृदयाकडे रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. अडथळा दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. ससून रुग्णालयात गेल्या तीन वर्षांमध्ये अँजिओप्लास्टी करण्याचे प्रमाणही वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात 2017 मध्ये 356 अँजिओप्लास्टी करण्यात आल्या होत्या. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये ही संख्या 432 आहे. अनियमित जीवनशैली आणि वाढलेली चिंता यामुळे हृदयाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2020 मध्ये नियोजित शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, आपत्कालीन शस्त्रक्रिया असल्याने अँजिओप्लास्टी केल्या जात होत्या. ससून सर्वोपचार रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे म्हणाले, ‘सर्वसामान्य लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित असले तरी, तरुण रुग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, कोरोनाचा संसर्ग आणि त्याची तीव्र यांचा रुग्णाच्या हृदयाच्या समस्येशी काही संबंध आहे का हे समजून घेण्यासाठी सध्या विविध विभागांत दाखल असलेल्या गंभीर रुग्णांचा अभ्यास केला जात आहे. केंद्र सरकारच्या ‘अ‍ॅडव्हर्स इफेक्ट सिरो सर्व्हेलन्स ऑफ इंडिया’ या नावाच्या अभ्यासांतर्गत याचा समावेश आहे.

Back to top button