दिवाळी फराळ चालला सातासमुद्रापार: नातेवाईक, मित्रमंडळींसाठी स्वादिष्ट पदार्थांची खास भेट | पुढारी

दिवाळी फराळ चालला सातासमुद्रापार: नातेवाईक, मित्रमंडळींसाठी स्वादिष्ट पदार्थांची खास भेट

सुवर्णा चव्हाण

पुणे : दिवाळीसाठी अनारसे, चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, करंजी अन् शेव…असा खमंग अन् स्वादिष्ट फराळ पुण्यातून परदेशात रवाना होत आहे. विदेशात राहणार्‍या नातेवाइक आणि मित्र-मैत्रिणींसाठी पुणेकरांनी लज्जतदार, चविष्ट फराळ पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कुरिअर कंपन्यांकडे फराळाचे पार्सल पाठविण्यासाठी गर्दी वाढली आहे.

अमेरिका, सिंगापूर, इंडोनेशिया, ब्रिटन, कॅनडा…अशा विविध देशांमध्ये फराळ पाठविला जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षे परदेशात फराळ पाठविण्यास अनेक अडचणी आल्या, पण, निर्बंधमुक्त दिवाळीत साजरी होत आहे. त्यामुळे त्या-त्या देशांचे नियम पाळून पार्सल पाठविण्यात येत आहेत. काही कुटुंबांकडून महिला बचत गट, मिठाईवाले, घरगुती महिला व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक यांच्याकडून रेडिमेड फराळ विकत घेऊन परदेशातील आप्तेष्ठांना पाठविला जात आहे, तर काही जण घरीच तयार केलेला फराळ पाठवत आहेत. नातेवाईक, आप्तेष्टांची दिवाळी खास बनावी यासाठी फराळ रवाना होत आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशात फराळ आणि इतर साहित्य पाठविले जातो.

यंदा दिवाळी काही दिवसांवर आल्याने पार्सल लवकरात लवकर पाठविण्यावर भर दिला जात आहे. एका कुरिअर कंपनीचे संचालक दीपक नाडकर्णी म्हणाले, विविध देशांमध्ये फराळ पाठविण्यास तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. अनेक लोक आमच्याकडे पार्सल पाठविण्यासाठी येत असून, साधारणपणे 70 ते 90 पार्सल रोज विविध देशांमध्ये पाठवित आहोत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर अशा वेगवेगळ्या देशांमध्ये पार्सल पाठविले जात आहेत.

माझी दोन्ही मुले अमेरिकेत राहतात. दिवाळीनिमित्त त्यांच्यासाठी साधारणपणे 30 किलोंचे पार्सल कुरिअर कंपनीद्वारे पाठविले असून, सात ते आठ दिवसांत ते मुलांना मिळेल. या पार्सलमध्ये फराळासह इतर साहित्यही आहे. मी दरवर्षी दिवाळीत पार्सल पाठविते. त्यांना दिवाळीला घरची कमतरता भासू नये म्हणून आम्ही नेहमीच पार्सल पाठवितो. दिवाळीनिमित्त त्यांना पार्सल पाठवून खूप आनंद मिळतो.
– वृषाली क्षीरसागर

Back to top button