बारामती तालुक्यात पावसाचा कहर ! कार्हाटीत मोटार गेली वाहून | पुढारी

बारामती तालुक्यात पावसाचा कहर ! कार्हाटीत मोटार गेली वाहून

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला मंगळवारपासून पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मंगळवारी मुर्टी, सुपे परिसरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले. बुधवारी (दि.१२) सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे.या पावसामुळे कऱ्हा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या पाण्यात एक मोटार वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान या मोटारीचा अद्याप तपास लागलेला नाही. लोणी भापकर येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाची ही मोटार असल्याची माहिती मिळाली. ते नदी पार करत असताना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही गाडी वाहून गेली.

सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. डाॅ. बारवकर हे त्या मोटारीत होते. दवाखाना बंद करून मंगळवारी ते घराकडे परतत असताना ही घटना घडली. पुलावरून गाडी वाहून जावू लागल्यावर त्यांनी थेट गाडीतून उडी मारत आपला जीव वाचवला. नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही नदीपत्रात न जाण्याचे आवाहन महसूल खात्याच्या वतीने गावकामगार तलाठी श्याम झोडगे यांनी केले आहे. दरम्यान बुधवारी सकाळपासूनच बारामती शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. बारामती शहरात पावसाचा जोर अधिक असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Back to top button