बस जळीतकांडाचं सत्र थांबेना ! भीमाशंकरला निघालेली खासगी बस आगीत जाळून खाक | पुढारी

बस जळीतकांडाचं सत्र थांबेना ! भीमाशंकरला निघालेली खासगी बस आगीत जाळून खाक

मंचर: पुढारी वृत्तसेवा : भिवंडी येथील पाया गावातून २७ प्रवासी घेऊन भीमाशंकरला देवदर्शनाकरिता निघालेल्या खासगी मिनी बसला घोडेगाव -भीमाशंकर रस्त्यावर घोडेगाव जवळील शिंदेवाडीजवळ बुधवारी( दि.१२) पहाटे अचानक आग लागली. या घटनेत बस , बसची कागदपत्रे पूर्णपणे जळून खाक झाली असून बसमधील सर्व प्रवासी, चालक वाहक असे सर्वजण सुखरूप आहेत.

याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहिती अशी की बाबू बसप्पा सुरपूर (वय ३० रा. कल्याण डोंबिवली ठाणे) हा मंगळवारी( दि. ११) रात्री भिंवडी येथील पाया गावातील एकुण २७ प्रवासी घेऊन मिनी बस (एम एच ०५ डी के ९६९९) घेऊन भिमाशंकर येथे देवदर्शनाकरीता चालले होते. बुधवारी सकाळी ६:३० वाजता घोडेगाव हद्दीत घोडेगाव ते भिमाशंकर जाणाऱ्या रस्त्यावर शिंदेवाडी येथे मिनी बस आली असताना बसने अचानकपणे पेट घेतला. बसने पेट घेताच बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले. त्यामुळे मोठे दुर्घटना टळली.

त्यावेळी बसमधील चंद्रशेखर गोपाऴ घोलप यांनी डायल ११२ ला संपर्क करून पोलिसांना बस पेटल्याची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांची टीम घटनास्थळी आली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसला लागलेली विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका अधिकच वाढल्याने आग विझली नाही.  या आगीत पूर्ण बस जळून खाक झाली तसेच गाडीतील बसची कागदपत्रे, काही प्रवाशांच्या बॅगा जळून गेल्या आहे. बसला आग कशामुळे लागली याची माहिती पोलीस घेत असल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली .
याबाबत बस चालक बाबू सुरपुस यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वायाळ करत आहे.

Back to top button