खेडच्या पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस | पुढारी

खेडच्या पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस

कडूस : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात परतीच्या पावसाने दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावल्याने चासकमान धरण पुन्हा 100 टक्के भरले आहे. खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून मंगळवारी (दि. 11) दुपारी 4.45 वाजता धरणाच्या विद्युत विमोचक व कालव्याद्वारे एकूण 600 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा अंदाज घेऊन सुरुवातीला मंगळवारी सकाळी 8 वाजता विद्युत विमोचकाद्वारे 300 तर डाव्या कालव्याद्वारे 100 क्युसेक व भीमा नदीपात्रात 200 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. दुपारी पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने 4.45 वाजता विद्युत विमोचकाद्वारे 600 क्युसेक त्यापैकी डाव्या कालव्याद्वारे 100 क्युसेक व भीमा नदीपात्रात 500 क्युसेक पाणी विसर्ग सोडण्यात आला आहे.

चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून एकूण 964 मिलिमीटर, तर मागील 24 तासात 1 मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास कुठल्याही क्षणी धरणाच्या सांडव्याद्वारे भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button