पुणे : लोकाभिमुख आरोग्य व्यवस्थेस प्राधान्य : आयुक्त तुकाराम मुंढे | पुढारी

पुणे : लोकाभिमुख आरोग्य व्यवस्थेस प्राधान्य : आयुक्त तुकाराम मुंढे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘आरोग्य विभाग प्रभावी समन्वयाने काम करेल, लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख आरोग्य व्यवस्थेच्या निर्मितीस प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे,’ असे मत आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यात विभागप्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केले. ‘पुण्यातील विविध विभागांचा आढावा घेत मुंढे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आरोग्यसेवा उपक्रमांना मदत करणार्‍या शासकीय, निमशासकीय विकासात्मक संस्था यांनीही आपली भूमिका व कार्यातील उणिवा यांचा अभ्यास करावा,’ असे त्यांनी सुचवले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आयपीएचएस स्टँडर्डनुसार, आरोग्य प्रणालीसाठी वापरात येणार्‍या सेवा, आरोग्य सेवेतील घटक, आरोग्य माहिती प्रणाली, आवश्यक औषधांची उपलब्धता, वित्त पुरवठा, नेतृत्व व शासन या घटकांवर भर देण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. बैठकीत आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक संचालक व विकासात्मक स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार उपस्थित होते.

या केल्या सूचना
आरोग्यसेवाविषयीची माहिती अद्ययावत ठेवून त्यांचे नियोजन व संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा.

ऋतूनुसार आरोग्य सेवांची तयारी ठेवावी.

साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे.

रोजच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचार्‍यांची यांच्याशी समन्वय व नियंत्रण ठेवून पाठपुरावा करावा.

जिल्हा व गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून रोजचा आढावा घेतला जावा.

Back to top button