पिंपरी : फाईव्ह जी पडेल महागात..! नेटवर्क अपग्रेड करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा नवीन फंडा | पुढारी

पिंपरी : फाईव्ह जी पडेल महागात..! नेटवर्क अपग्रेड करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा नवीन फंडा

संतोष शिंदे :

पिंपरी : अनोळखी व्यक्ती मोबाईलवर फोन करून जर नेटवर्क अपग्रेड करण्याचा आग्रह धरीत असेल, तर जरा सावध व्हा..! कारण सायबर चोरट्यांनी नेटवर्क अपग्रेड करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा नवीन फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडून नेटकर्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतात नुकतेच फाईव्ह जी तंत्रज्ञान प्रणालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सध्या कार्यान्वित असलेल्या फोर जीपेक्षा अधिक वेगवान व इतरही अनेक सुविधा देणारी फाईव्ह जी प्रणाली असल्याने नेटकर्‍यांनी फाईव्ह जीसाठी धडपड सुरू केली. याचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आणला. यामध्ये नेटवर्क अपग्रेड करण्याच्या बहाण्याने नागरिकांना एक लिंक शेअर करून फसवणूक केली जाते. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिसांनी नागरिकांना अनोळखी कॉलर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

लिंकवर क्लिक करण्याचा आग्रह
सायबर चोरटे तुम्हाला कॉल अथवा मेसेजदेखील करू शकतात. नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून प्रोसेस पूर्ण करण्यास सांगितले जाते. तसेच, काही वेळेस सोबत दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती जाणून घ्या, असा आग्रह केला जातो. मोबाईलधारकाने संबंधित लिंकवर क्लिक केल्यास बँक खात्यातील रक्कम परस्पर दुसर्‍या खात्यावर हस्तांतरित होते.

चोरट्यांकडून ब्लॅकमेल
अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास सायबर चोरटे तुमच्या मोबाईलमधील खासगी फोटोसह सर्व डेटा चोरी करतात. त्यानंतर पैशाची मागणी करून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. यापूर्वी अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत.

ओटीपीचा धडाका सुरूच
मोबाईलवर आलेला 4 अंकी नंबर किंवा ओटीपी विचारून सायबर चोरट्यांनी अनेकांची बँक खाती रिकामी केली आहे. अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती किंवा ओटीपी शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांकडून अनेकदा करण्यात आले. मात्र, तरीदेखील नागरिक ओटीपी शेअर करतात. त्यामुळे पोलिसही हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळते.

 

अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाईन पद्धतीने नेटवर्क अपग्रेड करणे धोक्याचे आहे. त्यामुळे अनोळखी कॉलर्सच्या सांगण्यावरून कृती करू नये. तसेच, नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे देऊ नयेत. आपण स्वतःच मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन उपलब्धतेनुसार नेटवर्क अपग्रेड करू शकतो.
                                                    -डॉ. संजय तुंगार, सायबर सेल, पिंपरी- चिंचवड

Back to top button