पिंपरी : वायसीएम पद्व्युत्तर संस्थेमध्ये चार नवीन अभ्यासक्रमांना मान्यता | पुढारी

पिंपरी : वायसीएम पद्व्युत्तर संस्थेमध्ये चार नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत नवीन चार अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नतेसाठीदेखील आवश्यक मागणी करण्यात आली आहे.

तीन वर्षांत 39 विद्यार्थ्यांना संधी
त्वचारोग, नेत्ररोग, उरोरोग, सामाजिक वैद्यकशास्त्र अशा चार अभ्यासक्रमांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. हा वैद्यकीय अभ्यासक्रम पदव्युत्तर आहे. त्या अंतर्गत एकूण 13 जागांवर पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे अनुक्रमे 13 या प्रमाणे एकूण 39 विद्यार्थी तीन वर्षांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. या चार अभ्यासक्रमांना मंजुरी देणारा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय वायसीएम रुग्णालय प्रशासनाला सोमवारी प्राप्त झाला आहे.
तर, सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून या अभ्यासक्रमांसाठी मंजुरी मिळाली होती, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

सूक्ष्म जीवशास्त्र (मायक्रोबायलॉजी) आणि न्यायवैद्यक शास्त्र (फोरेन्सिक मेडिसीन) हे अभ्यासक्रम तसेच दंतरोग विभाग आणि इमर्जन्सी मेडिसीनसाठी प्रस्तावित आहे. नवीन अभ्यासक्रम आणि विभागांसाठी आवश्यक पदनिर्मिती करून त्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठवावा लागणार आहे.

Back to top button