पुणे : शहराला दीड वर्ष पुरेल एवढे पाणी गेले वाहून | पुढारी

पुणे : शहराला दीड वर्ष पुरेल एवढे पाणी गेले वाहून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून यंदा मुठा नदीत आतापर्यंत 23.05 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडून देण्यात आले आहे.
शहराला दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. त्यानुसार शहराला तब्बल दीड वर्ष पुरेल एवढे पाणी आतापर्यंत सोडून देण्यात आले आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये सध्या 29.08 टीएमसी म्हणजेच 99.77 टक्के पाणीसाठा आहे.

त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत शहर आणि जिल्ह्याला अनुक्रमे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा हंगामात 12 जुलै रोजी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पानशेत धरण 11 ऑगस्ट, तर वरसगाव हे धरण 13 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरले. त्यामुळे या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. आतापर्यंत 23.05 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Back to top button