पुणे : सामान पाणीपुरवठ्याचे वाटप झाल्यानंतरही पाणीटंचाई | पुढारी

पुणे : सामान पाणीपुरवठ्याचे वाटप झाल्यानंतरही पाणीटंचाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेची कामे ज्या भागात पूर्ण झालेली आहेत, त्या भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेचे शहरातील सर्व कामे पूर्ण झाल्यावरही परिस्थिती ‘जैसे थे’च राहणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील नागरिकांना उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आणि पाण्याची गळती थांबविण्यासाठी महापालिकेने तीन हजार कोटी खर्चाची समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील 30 वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे.

योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी 82 पाणी साठवण टाक्या, 1668.72 किमी लांबीची पाईपलाईन (जलवाहिन्या) आणि 3 लाख 1 हजार 594 पाणी मीटर बसवणे आदी कामे केली जाणार आहे. सध्या योजनेचे काम प्रगती पथावर असून, 43 पाणी साठवण टाक्यांची कामे झाली आणि तर उर्वरित टाक्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच 3 लाख 1 हजार 594 पैकी 98 हजार 372 पाणी मीटर बसविण्यात आली आहेत. मीटर बसविण्यास नागरिकांकडून विरोध होत असला तरी प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करून काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकही त्याला प्रतिसाद देत आहेत.

वारजे, कर्वेनगर, शिवणे या परिसरात समान पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या, पाण्याची टाकी आदींची कामे पूर्ण झालेली आहेत. तरीही या भागात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने वारजे, कर्वेनगर भागातील माजी नगरसेवकांनी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेउन तक्रारी मांडल्या. या तक्रारींचे तातडीने निवारण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शिष्टमंडळामध्ये दिलीप बराटे, दीपाली धुमाळ, सचिन दोडके, सायली वांजळे, लक्ष्मी दुधाणे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिकांचा समावेश होता.

समान पाणीपुरवठा योजनेची झालेली कामे
82 पैकी 43 टाक्यांची कामे पूर्ण झालेली आहेत.
उर्वरित 39 मधील 3 टाक्यांची कामे 85 टक्के पूर्ण
4 टाक्यांची कामे 60 ते 85 टक्के
2 टाक्याची कामे 50 ते 60 टक्के
3 टाक्यांची कामे प्रगतीपथावर
13 टाक्यांचे 50 टक्के काम पूर्ण
6 टाक्यांसाठी भूसंपादन झालेले नाही

Back to top button