नानगाव : डेंग्यूच्या तापाने नागरिक हैराण; डासांपासून होणार्‍या आजारांमध्ये होतेय वाढ | पुढारी

नानगाव : डेंग्यूच्या तापाने नागरिक हैराण; डासांपासून होणार्‍या आजारांमध्ये होतेय वाढ

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: सध्या पावसामुळे ठिकठिकाणी डबकी, गटरात पाणी साठत आहे. गावात रस्त्यांच्या कडेला गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असून भीमा नदीकाठच्या गावांत डेंग्यूच्या थंडी-तापामुळे जनता फणफणली आहे. पाण्याच्या डबक्यांबरोबरच घरातील फ्रीज, पाण्याच्या टाक्याही नागरिक वेळेवर साफ करत नाहीत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवसही नागरिक पाळत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

पावसामुळे टायर, नारळाच्या करवंट्या, डबे, बाटल्या, गाडगी आदींमध्ये पाणी साठून डासांची उत्पत्ती होत आहे. परिणामी भीमा नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणावर डेंग्यू व इतर आजारांंचे रुग्ण दिसून येत आहेत. गेली एक ते दीड महिन्यापासून या आजारात वाढ होत आहे.

खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढताना दिसून येत आहे. रुग्णाला सुरुवातीला थंडी व ताप, डोके दुखणे, मळमळणे, हातपाय दुखणे अशी लक्षणे आढळून येतात. आजार बळावल्यास रुग्णांच्या पेशी कमी होऊन रुग्ण गंभीर होतो. वाढता डासांचा प्रादुर्भाव पहाता गावागावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डास प्रतिबंधक फवारण्या, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली पाहिजे.

पूर्वी गावात डेंग्यूचा रुग्ण आढळला तर गावातील आरोग्य विभाग गावात गृहभेटी देत होता. मात्र, सध्या असे काही होताना दिसत नाही. गावात डेंग्यूचे रुग्ण असल्याने आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

                            – माऊली शेळके – सरचिटणीस, जिल्हा भाजप किसान मोर्चा.

थंडी, ताप आल्यास त्यांनी तत्काळ आपल्या गावातील सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. सरकारी आरोग्य केंद्रात सेवा मोफत मिळत असून नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे.

                                    – उज्ज्वला जाधव – तालुका आरोग्य अधिकारी, दौंड

 

 

 

Back to top button