सणसवाडी येथे रस्त्याच्या कडेलाच कचर्‍याचे ढीग | पुढारी

सणसवाडी येथे रस्त्याच्या कडेलाच कचर्‍याचे ढीग

कोरेगाव भीमा; पुढारी वृत्तसेवा: सणसवाडी येथील ग्रामपंचायतीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या कडेने कचर्‍याचे ढीग साचत आहेत. रस्त्याच्या कडेला कचरा साठविण्यासाठी ठेवण्यात आलेली कचराकुंडी पूर्ण भरलेली आहे. कचराकुंडी पूर्ण भरून त्यातील कचरा रस्त्यावर पसरू लागल्याने आता ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. या रस्त्याच्या बाजूने शाळेतील लहान विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी पायी प्रवास करीत असतात.

रस्त्याशेजारी अनेक व्यावसायिकांची दुकाने तर छोटी-मोठी हॉस्पिटल देखील आहेत, तर काही नेतेमंडळींची संपर्क कार्यालये देखील रस्त्याच्या बाजूलाच आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सणसवाडीत पुणे-नगर रस्त्याच्या कडेलाही ठिकठिकाणी कचर्‍याचे छोटे-मोठे ढीग साठू लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत व स्थानिक प्रतिनिधी या समस्येकडे काणाडोळा करीत आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून चर्चेला येत आहे. लवकरात लवकर या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी परिसरातील व्यावसायिक व ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button