पुणे : शाळांमधून होणार जागर स्वावलंबी शिक्षणाचा | पुढारी

पुणे : शाळांमधून होणार जागर स्वावलंबी शिक्षणाचा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस देशभर वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’च्या वतीने पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांत ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेतील एक विद्यार्थी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तो विद्यार्थी गावात, शहरात दै. ‘पुढारी’ वृत्तपत्राचे वाचकांना वाटप करून स्वावलंबी शिक्षणाचा संदेश थेट कृतीतून देणार आहे. डॉ. कलाम यांनी आपल्या शालेय जीवनात वृत्तपत्रांचे वाटप करीत शिक्षण घेतले.

त्यामुळे त्यांचा जन्मदिवस गेली काही वर्षे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 15 ऑक्टोबर हा ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला बळ देत वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दै. ‘पुढारी’कडून हा विशेष उपक्रम हाती घेण्यात येत आहे. डॉ. कलाम यांच्या स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्या दिवशी गावातील वृत्तपत्र विक्रेते तथा एजेंट आणि डॉ. कलाम यांची व्यक्तिरेखा साकारणार्‍या विद्यार्थ्यांचे शाळेकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे.

‘वृत्तपत्र वाचन : काळाची गरज’ आणि ‘मी डॉ. अब्दुल कलाम बोलतोय’ या विषयावर विद्यार्थी मनोगत व्यक्त करणार आहेत. दि. 15 ऑक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत दै. ‘पुढारी’ वृत्तपत्राचे वाचन करून ‘वाचन प्रेरणा दिन’ही साजरा केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणार्‍या शाळांनी उपक्रमाचा व्हिडीओ आणि फोटो र्िीपशर्ऽिीवहरीळ.ले.ळप या मेल आयडीवर पाठवायचा आहे. दै. ‘पुढारी’तर्फे हा उपक्रम नावीन्यपूर्ण पद्धतीने राबविणार्‍या शाळांची विशेष दखल घेतली जाणार आहे. या उपक्रमात दै. ‘पुढारी’समवेत पुणे जिल्हा परिषदेचा देखील सहभाग असणार आहे.

असा असेल उपक्रम…
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा होणार सहभागी
प्रत्येक शाळेतील एक विद्यार्थी डॉ. कलाम यांची व्यक्तिरेखा साकारणार
विद्यार्थी दै. ‘पुढारी’च्या अंकाचे वितरण करून देणार स्वावलंबी शिक्षणाचा संदेश
वृत्तपत्र विक्रेत्यांचा शाळेत होणार गौरव
‘वाचन प्रेरणा दिन’निमित्त दै. ‘पुढारी’चे होणार वाचन

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी साजर्‍या होणार्‍या ‘वाचन प्रेरणा’ आणि ‘वृत्तपत्र विक्रेता दिना’निमित्त
दै. ‘पुढारी’ राबवत असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ‘पुढारी’च्या या उपक्रमामुळे राज्यात वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या या उपक्रमाची निश्चितच मदत होणार आहे. आदर्श भावी पिढी घडविण्याचे उल्लेखनीय काम दै. ‘पुढारी’ने हाती घेतले आहे.

                                                        – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय विज्ञान पुढे घेऊन जाण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. मी विद्यार्थी असल्यापासून ते माझे प्रेरणास्थान राहिलेले आहेत. ते राष्ट्रपती असताना मला त्यांना एका कार्यक्रमात ऐकण्याची संधी देखील मिळाली होती. त्यांच्या भाषणाने प्रभावित झालो आणि मी पुढे अभ्यास करून देशसेवेत दाखल झालो. मला विश्वास आहे की, त्यांचे जीवन, त्यांच्या कामाची प्रेरणा जिल्हा परिषदेचे विद्यार्थीही घेतील. दै. ‘पुढारी’ने अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षणाबरोबरच वाचनाची देखील गोडी निर्माण होईल.
 

                    – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

Back to top button