पुणे : आंतरराष्ट्रीय उड्डाणे कधी? सेवेसाठी प्रशासकीय पातळीवर उदासीनता

पुणे : आंतरराष्ट्रीय उड्डाणे कधी? सेवेसाठी प्रशासकीय पातळीवर उदासीनता

प्रसाद जगताप
पुणे : मागील महिन्यात केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुण्यातून 6 ठिकाणी लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे सुरू करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही ठोस पाऊल विमानतळ प्रशासनाने उचलल्याचे पाहायला मिळत नाही. यामुळे पुणेकरांमध्ये नाराजीचे वातावरण असून, पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांना आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा सवाल केला जात आहे.

कोरोनानंतर आता पुण्यातून जाणार्‍या विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून, दिवसाला 160 ते 170 विमानांची येथून ये-जा सुरू असते. यातील बहुतांश प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुण्यातून मुंबई, दिल्ली विमानतळांकडे धाव घेत असतात. त्यामुळे पुण्यातूनच थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी, अशी पुणेकरांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तसेच, यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर नागरिकांकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.

यासोबतच विमानतळ प्रशासनाच्या अधिकार्‍यांसोबत प्रवासी संघटना, व्यापारी यांच्या अनेकदा बैठका देखील झाल्या आहेत. त्यानंतर मागील महिन्यात केंद्रीय मंत्र्यांच्या दौर्‍यात या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. परंतु, प्रशासकीय पातळीवर याबाबत उदासीनताच असल्याचे चित्र दिसत आहे. अद्याप नियाजित सहापैकी एकही आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण पुण्यातून सुरू झालेले नाही.

बैठकांवर बैठका…
पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत. यात विमानतळ प्रशासनासह विमानतळ सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी देखील पुढाकार घेतला आहे. यासोबतच मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनेसुध्दा याकरिता प्रयत्न करण्यात आले.

व्यापाराला मिळणार चालना
पुणे ही भारतातील आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था मानली जाते. देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न येथून मिळत आहे. शहराच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला, उद्योग, तंत्रज्ञान, उत्पादन, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी पुणे विमानतळाला आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी असणे आता गरजेचे झाले आहे.

सिंगापूर विमानसेवा पुढच्या महिन्यात?
पुणे विमानतळावरून सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, अबुधाबीसह आणखी दोन ठिकाणी लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे विमानतळ प्रशासनाचे नियोजन आहे. त्याकरिता प्रशासनाने विमान कंपन्यांना यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे आणि मंर्त्यांनीही त्याला हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात, पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये नियोजित 6 देशांपैकी सिंगापूरसाठी पुण्यातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई, दिल्लीच्या फेर्‍या वाचणार…
सध्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करायचा असेल, तर पुणेकरांना मुंबई व दिल्ली विमानतळांवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील प्रवाशांची गर्दी मुंबई व दिल्ली विमानतळांवर वाढत आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली विमानतळांवर प्रचंड ताण येत आहे. पुण्यातूनच जर आंतरराष्ट्रीय विमानसेवा मिळाली; तर मुंबई, दिल्ली विमानतळांवरील गर्दीचा भार नक्कीच कमी होणार असून, पुणेकरांची मुंबई, दिल्लीकडे होणारी धावपळ वाचणार आहे.

धावपट्टीचा विस्तार आवश्यक…
पुणे विमानतळावरून आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढविण्यात येणार आहे. त्याकरिता पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार होणे महत्त्वाचे आहे. पीएमसी आणि आयएएफच्या प्रतिनिधींनी पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या पश्चिमेकडील भूसंपादनाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली, तर मोठ्या विमानांच्या लँडिंगसाठी सध्याची धावपट्टी वाढविता येईल. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुधारणार असून, वेगवान देखील होणार आहे.

पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि कार्गो सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. या सेवेचा फायदा पुण्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील प्रवाशांना होणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. पुणे शहर हवाई मालवाहतुकीत देशात 10 व्या क्रमांकावर, तर इंजिनिअरिंग गुड्स वाहतुकीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय सेवेचा मोठा फायदा होणार असून, येथून थेट शेतमाल उत्पादनदेखील परदेशात पाठविण्यास मोठी मदत होईल.

 – प्रशांत गिरबाने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरल

पुण्यातून 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी एक म्हणजेच पुण्यातून सिंगापूरसाठी विमानसेवा सुरू करण्याचे सध्या नियोजन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर ही सेवा कधी सुरू करायची, याबाबत निर्णय घेतला जाईल.

                                                          – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news