पुणे : पावसाने दाणादाण; आजही मुसळधार शक्य! झाडपडी, पाणी तुंबण्याची शक्यता | पुढारी

पुणे : पावसाने दाणादाण; आजही मुसळधार शक्य! झाडपडी, पाणी तुंबण्याची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरीमध्ये सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरून जोरदार पाणी वाहिले, रस्त्यात पडलेल्या खड्डयांत पाणी साचल्यामुळे वाहने चालविणे अवघड झाले. पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील वाहतूक विस्कळीत झाली. एक ते अर्धा तासात शहरात 10.7 मिलिमीटर पाऊस बरसला. मात्र, उपनगरातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. येत्या 48 तासांत शहरात मुसळधार पाऊस बरसणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावे, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. शहर आणि परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाल्याने शहरात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत होते. सोमवारी दुपारनंतर मात्र अचानक जोरदार पाऊस बरसण्यास सुरूवात झाली. त्यामुळे हवेत गारवा तयार झाला. अर्धा ते एक तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच ताराबळ उडाली.

हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासांत शहरात मुसळधार पाऊस बरसणार आहे. यामुळे झाडपडीसह सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी कच्च्या रस्त्यावरून प्रवास टाळावा. रात्रीच्या वेळी धुक्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे रात्री बाहेर पडू नये, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी पडलेला पाऊस (मिमी)
शिवाजीनगर ः 10.7
पाषाण ः 23
चिंचवड ः 11.5
लवळे ः 7.5
मगरपट्टा ः 29
कात्रज/आंबेगाव ः 341.2
खडकवासला ः 58
वारजे ः 29

Back to top button