पिंपरी : घंटागाडीवरील कर्कश स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण; श्रीमंत महापालिकेच्या गाड्यांची दुरवस्था | पुढारी

पिंपरी : घंटागाडीवरील कर्कश स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण; श्रीमंत महापालिकेच्या गाड्यांची दुरवस्था

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: घराघरांतून कचरा गोळा करण्यासाठी दररोज घंटागाडी येते; मात्र घंटागाडीवरील कर्कश आवाजातील स्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. त्याचे स्पीकर चांगल्या दर्जाचे असावेत. त्यामुळे स्पष्ट व मधुर आवाज ऐकू जाईल; तसेच एकच गाणे बारा महिने ऐकविले जाऊ नये. श्रीमंत महापालिकेने चांगल्या दर्जाच्या घंटागाड्या घ्याव्यात, अशा तक्रारी नागरिकांनी सोमवारी (दि. 10) झालेल्या जनसंवाद सभेत केल्या.

सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात सोमवार (दि. 10) जनसंवाद सभा झाली. त्यात 54 नागरिकांनी उपस्थित राहून 75 पेक्षा अधिक तक्रारी मांडल्या. नागरिकांनी सांगितले की, घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यावरील कर्कश आवाजामुळे नागरिकांना विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. चांगल्या दर्जाचे स्पीकर पालिकेने उपलब्ध करून द्यावेत. दर महिन्यात नवीन गाणे त्यावर लावले जावे. तसेच, पालिकेसंदर्भातील माहितीही त्यावर दिली जावी. तसेच, घंटागाडीचे नियमितपणे स्वच्छता केली जावी.

घंटागाडीतून सफाई कामगारांचे धोकादायकरित्या ने-आण केली जाऊ नये, अशी तक्रार काही नागरिकांनी केली. तसेच, उघड्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांवर कारवाई करावी. पदपथांवरील राडारोडा उचलावा. नाल्यांमधून वाहणारे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

फुटलेल्या मैलावाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात. शहरात ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने धूर फवारणी करण्यात यावी.तसेच, जलवाहिन्यांचे अपूर्ण कामे पूर्ण करावीत; तसेच फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात. शहरात विविध ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत, अशा ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. रस्त्याचे अर्धवट असलेले काम पूर्ण करावे. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी. रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत.

सभेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. या वेळी क्षेत्रीय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करा’
रस्त्याच्या मध्यभागी व पदपथावरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत. नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी नव्याने पीएमपीचे बस स्थानक उभारण्यात यावेत. विद्युत खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स वार्‍यामुळे उडून नागरिकांच्या अंगावर पडत असून त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. असे फ्लेक्स तातडीने काढावेत. अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार्‍यांवर कारवाई करावी, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

Back to top button