पुणे : घोषित तारखेपूर्वीच कारखाना सुरू; बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई करा: राम शिंदे | पुढारी

पुणे : घोषित तारखेपूर्वीच कारखाना सुरू; बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई करा: राम शिंदे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार चालूवर्ष 2022-23 चा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असून, तत्पूर्वी ऊस गाळप केल्यास गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. त्या निर्णयाचा भंग करीत इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड या खासगी कारखान्याने 10 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू केल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री व भाजपचे आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सोमवारी (दि.10) त्यांनी भेट घेत निवेदन दिले आणि चर्चाही करीत या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. जे साखर कारखाने गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी सुरू करतील अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत 19 सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता. तसेच तशा परिपत्रकीय सूचना साखर आयुक्तालयानेही कारखान्यांना दिलेल्या आहेत.

दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेशाचा भंग होतो. बारामती अ‍ॅगो लिमिटेडने 10 ऑक्टोंबरला कारखाना सुरु करुन कायद्याचा भंग केल्याची तक्रार शिंदे यांनी करीत या कारखान्याच्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विना परवाना ऊस गाळपाचा विषय ऐरणीवर
बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड हा कारखाना राजेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यांशी संबंधित आहे. दरम्यान, चालूवर्षी आत्तापर्यंत 22 साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने साखर आयुक्तालयाने ऑनलाईनद्वारे वितरित केले आहेत. त्यामध्ये बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड या कारखान्यास परवाना वितरण करण्यात आले किंवा नाही, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, या निमित्ताने विना परवाना आणि घोषित तारखेपूर्वी ऊस गाळप सुरु करण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

‘बारामती अ‍ॅग्रो’ची मागणी केली होती अमान्य
इंदापूर येथील बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी 27 सप्टेंबर रोजी साखर आयुक्तांना पत्र देऊन कारखान्याचे ऊस गाळप 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरु करण्याची मागणी केली होती. त्यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 30 सप्टेंबर रोजीच्या पत्रात मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यात 15 ऑक्टोंबरपासून ऊस गाळप सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे कारखान्यांची विनंती अमान्य केली होती. तरीसुध्दा 10 ऑक्टोंबरपासून कारखाना सुरु झाल्याची तक्रार आल्यामुळे प्रादेशिक साखर सह संचालकांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंदापूर तालुक्यातील बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड या खाजगी कारखान्याने ऊस गाळप सुरु केल्याची तक्रार राम शिंदे यांनी केली आहे. त्यावर पुणे प्रादेशिक साखर सह संचालक धनंजय डोईफोडे यांना तत्काळ या प्रकरणी तपासणी करुन दोषी आढळल्यास कायद्यान्वये संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत.

                                               – शेखर गायकवाड, साखर आयुक्त,पुणे.

 

Back to top button