वाढदिवस ठरला अखेरचा दिवस ! बारामतीत अपघातात चिमुरड्याचा दुदैवी मृत्यू | पुढारी

वाढदिवस ठरला अखेरचा दिवस ! बारामतीत अपघातात चिमुरड्याचा दुदैवी मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा : नियतीने कोणावरही आणू नये, अशी वेळ बारामती तालुक्यातील मळद येथील थोरात कुटुंबियांवर आली. मुलाचा वाढदिवस साजरा करून गाण्यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जात असताना दुचाकीचालकाने मद्यधुंद अवस्थेत रस्त्याला लावलेले बॅरिकेट्स उडवले. त्यात लोखंडी अँगल डोक्याला लागल्याने अरहत प्रमोद थोरात (वय ३, रा. मळद, ता. बारामती) या चिमुरड्याचा मृत्यू झाला. रविवारी (दि. ९) रात्री साडे नऊच्या सुमारास येथील इंदापूर रस्त्यावरील जय शिवम हाॅटेलसमोर ही दुदैवी घटना घडली.

या प्रकरणी शहर पोलिसांनी संकेत प्रकाश खळदकर (रा. नानगाव, ता. दौंड) या दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांत शुभांगी प्रकाश कांबळे (रा. सटवाजीनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. अरहत याची आई प्रिती या फिर्यादीच्या भाची आहेत. अरहत याचा रविवारी वाढदिवस असल्याने ते कांबळे यांच्याकडे आले होते. रविवारी साडे नऊच्या सुमारास ते मेळाव्यानिमित्त आयोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे आयोजित गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी निघाले होते. फिर्यादीच्या हाताला धरून अरहत हा चालत निघाला होता.

रस्त्यावर असणारे एक लोखंडी बॅरिकेट्स ओलांडून ते पुढे जात असताना अचानक भरधाव वेगाने एक दुचाकी आली. त्याने बॅरिकेट्सला धडक दिली. ते बॅरिकेटस उडून फिर्यादीच्या हाताला लागले. हाताला धरून चालणाऱया अरहत याच्या डोक्याला लागून तो उडून पडला. त्याच्या डोक्यातून रक्त येवू लागले. त्याला तात्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथे डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या कुटुंबावर त्यामुळे मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी दुचाकी (एमएच ४२ पी-४९५९) वरील चालक संकेत खळदकर याला पकडले. पोलिसांनी त्याच्याविरोधात भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने दुचाकी चालवून चिमुरड्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Back to top button