महापालिका क्रीडा विभागाचा ‘फुटबॉल’! ; कार्यालयास कायमस्वरूपी हक्काचे ठिकाण मिळत नसल्याने वारंवार स्थलांतराची नामुष्की | पुढारी

महापालिका क्रीडा विभागाचा ‘फुटबॉल’! ; कार्यालयास कायमस्वरूपी हक्काचे ठिकाण मिळत नसल्याने वारंवार स्थलांतराची नामुष्की

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहराला स्पोर्ट्स हब करण्याचे नियोजन करीत पिंपरी-चिंचवड महापालिका कोट्यवधी रुपयांची उधळण करीत आहे, तर दुसरीकडे क्रीडा विभागालाच कायमस्वरूपी हक्काचे कार्यालय मिळत नसल्याने त्यांचा अक्षरश: ‘फुटबॉल’ झाला आहे. या प्रकारामुळे क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला स्पोर्ट्स हब अशी नवी ओळख मिळवून देण्यासाठी महापालिकेकडून विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. तसेच, काही निवडक खेळांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महापालिका व खासगी शाळेतील विद्यार्थी-खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमांसाठी पालिका कोट्यवधींचा वारेमाप खर्च करीत आहे. असे असताना दुसरीकडे, पालिकेच्याच क्रीडा विभागास हक्काचे कायमस्वरूपी कार्यालय मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

विरोधामुळे गांधीनगरच्या कार्यालयाचे स्थलांतर
नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयच्या प्रेक्षक गॅलरीखाली क्रीडा विभागाचे अनेक वर्षे कार्यालय होते. ते कार्यालय सर्वांना परिचित होते. मात्र, स्टेडिमयचे बांधकाम धोकादायक झाल्याने तसेच, कार्यालयात सापांचा वावर वाढल्याने तेथून कार्यालय प्रथम मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे हलविण्यात आले. काही महिन्यांतच तेथून कार्यालयाचे स्थलांतरण करण्यात आले. गांधीनगर, पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीमध्ये नव्याने कार्यालय थाटण्यात आले. त्या इमारतीमध्ये इतर विभागाचे कार्यालय व विभाग सुरू करण्यास विरोध झाल्याने क्रीडा विभागाने पुन्हा एकदा आपला मुक्काम हलविला.

नागरिकांना कार्यालयाची माहितीच नाही
बिजलीनगर, चिंचवड येथील खासगी इमारतीमध्ये क्रीडा विभाग सुरू करण्यात आला. तेथे वर्षे, दीड वर्षे झाल्यानंतर आता पुन्हा क्रीडा विभाग खराळवाडी, पिंपरीत हलविण्यात आले आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाशेजारील इमारतीमध्ये नवीन कार्यालय थाटण्यात आले आहे. त्याबाबत नागरिकांना माहिती नाही.

लाखो रुपयांचा खर्च वाया
क्रीडा विभागाचे कार्यालय काही महिन्यांतच दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर होते. त्या ठिकाणी विविध केबिन, फर्निचर, विद्युत व्यवस्था व इतर कामे केली जातात. रंगरंगोटी केली जाते. स्थलांतर झाल्याने तो लाखोंचा खर्च वाया जातो. पुन्हा नव्या ठिकाणी हाच खर्च होतो. त्यातून पालिकेची लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. तर, तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खेळाडूंची गैरसोय
नागरिक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रथम चिंचवडला जातात. तेथून कार्यालय स्थलांतरीत झाल्याचे समजल्यानंतर त्यांना खराळवाडीत कार्यालय शोधत फिरावे लागते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार कार्यालय हलविले जात असल्याने पालिकेच्या कारभारावर क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. क्रीडा विभागास हक्काचे कायमस्वरूपी कार्यालय मिळत नसल्याने त्या विभागाचा अक्षरश: ‘फुटबॉल’ झाला आहे. त्यामुळे तेथील अधिकारी व कर्मचार्यांचीही खासगीत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

Back to top button