पुणे : अडत्याकडून लूट! फूल उत्पादकाकडून वसूल केली भराई, तोलाई | पुढारी

पुणे : अडत्याकडून लूट! फूल उत्पादकाकडून वसूल केली भराई, तोलाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दसर्‍याच्या काळात गुलटेकडी मार्केट यार्डात फुले विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकर्‍याकडून तरकारी विभागातील अडतदाराने भराई व तोलाई वसूल केल्याचा प्रकार समोर आला. तरकारी विभागात फुलांच्या व्यवहाराची परवानगी व अधिकार नसताना हिशेब पट्टीत भराई, तोलाई कपात करीत शेतकर्‍याची लूट केली आहे. सातारा जिल्ह्यातून एक शेतकरी 4 ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डात 724 किलो फुले विकण्यासाठी आला. या वेळी त्या शेतकर्‍याने अडत्याकडे 724 किलो झेंडूचा व्यवहार केला.

फुल खरेदीनंतर अडत्याने गाडीमधील काही क्रेट खाली केले. त्यानंतर पावती करताना त्याने त्यामध्ये विशिष्ट हमालीची रक्कम नमूद केली. तसेच, भराई व तोलाईचे पैसे त्याच्या पैशातून वजा करत शिल्लक रक्कम शेतकर्‍याकडे सुपूर्त केली. एरवी फुलबाजारात शेतकर्‍यांच्या पट्टीतून हमाली व तीन टक्के आनुषंगिक खर्च वजा करत शिल्लक रक्कम देण्यात येते.

मात्र, सणासुदीच्या काळात चार पैसे मिळतील या अपेक्षेने फुले घेऊन आलेल्या शेतकर्यावर तरकारी विभागातील अडतदाराने अनावश्यक तोलाई व भराईचा बोजा टाकत लुट केल्याने बाजार समिती प्रशासन खरोखरच शेतकर्यांच्या विचार करते का असा प्रश्न उपस्थित होतो.

तरकारी विभागात फुलांचा व्यवहार होणे हे चुकीचे आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक शेतकर्‍याने या स्वरूपाचे धोरण अवलंबल्यास बाजार आवारात विस्कळितपणा येईल. त्यासाठी प्रशासनाने सणासुदीच्या काळात आवकेच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारातील अडतदारांसाठी तशी सोय करून देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून शेतकरी फुलबाजारात फुल आणण्यास प्रवृत्त होतील तसेच त्यांची फसवणुक होणार नाही व बाजार समितीला सेसरुपी उत्पन्नही मिळेल.
 

                 – अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन.

शेतकर्‍याने तरकारी विभागातील ओळखीच्या अडतदाराकडे फुलांचा व्यवहार केला त्यामुळे त्याकडून भराई व तोलाई वसुल करण्यात आली. त्याने फुलबाजारात व्यवहार केला असता तर त्यानुसार आनुषंगिक खर्च वसूल करण्यात आला असता. फुलमहोत्सवात फुलांची विक्री केली असती तर त्याकडून कोणताही अतिरिक्त खर्च वसुल करण्यात आला नसता. या प्रकरणाची माहिती घेऊन तरकारी विभागातील अडत्यांनी केवळ तरकारीची विक्री करावी याबाबत समज देण्यात येईल.

                             – मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

 

Back to top button