खासदार सुळे यांच्या दौर्‍याकडे मुळशीकरांचे लक्ष | पुढारी

खासदार सुळे यांच्या दौर्‍याकडे मुळशीकरांचे लक्ष

पौड; पुढारी वृत्तसेवा: खासदार सुप्रिया सुळे या सोमवारी (दि.10) मुळशी तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पौड येथे मुळशी तहसीलदार नवीन कार्यालयाचे भूमिपूजन नुकतेच आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. हे भूमिपूजन अतिशय घाईगडबडीत आणि गुपचूपपणे केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. यावर सुळे काही बोलणार की आमदार थोपटे यांच्याशी जुळवून घेणार याकडे मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.

पौड येथे झालेल्या तहसीलदार कार्यालयाच्या भूमिपूजनानंतर मंजूर झालेल्या 15 कोटी रुपयांच्या निधीच्या श्रेयासाठी चढाओढ सुरू झाली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यात सोशल मीडियावर बरीच मोठी लढाई झाली. याच लढाईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मौन धरले.
गेल्या अनेक वर्षांपासून पौड येथील असलेले तहसीलदार कार्यालयाची इमारत प्रशस्त व अद्ययावत व्हावी, अशी मागणी मुळशीकरांनी केली होती.

यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. काही दिवसांपूर्वी निधीची तरतूदही झाली. परंतु सत्ता बदलामुळे तसेच विविध कारणांमुळे भुमिपूजन होत नव्हते. सध्याच्या तहसीलदार कार्यालयामागे असलेल्या ठिकाणी बांधकाम करायचे ठरले होते. मात्र, त्याचे भूमिपूजन उरकण्यात आले. याबाबत खासदार सुळे कोणती भूमिका घेतात याकडे मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button