नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरी : राज्य शासनाने राज्यातील गरीब जनतेला दिवाळीची भेट दिली असून, किराणा दुकानामध्ये अंदाजित साडेतीनशे रुपयांना मिळणारा किराणा माल स्वस्त धान्य दुकानामध्ये केवळ शंभर रुपयांमध्ये मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील 1 लाख 28 हजार 476 रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एक किलो साखर, हरभरा डाळ, रवा, पामतेल मिळणार
राज्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने धान्य वितरण करण्यात येते. तसेच, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मोफत धान्याचे वितरणही सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त सवलतीच्या दरात 100 रुपये प्रति किट उपलब्ध केले आहे. त्यामध्ये 1 किलो साखर, 1 किलो हरभरा, 1 किलो पामतेल व 1 किलो रवा अशा अतिरिक्त शिधाजिन्नस दिवाळी सणानिमीत्त पॅकेज देण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन निर्णयनुसार दिले आहेत. तशा प्रकारचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत.
संच पोहचविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची
दरमहा मिळणारे नियमीत धान्य, प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्य या व्यतिरिक्त अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त दरात गोरगरीब जनतेला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पुणे विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवश्यक शिधाजिन्नस संचाची मागणी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह ड्यूर्स फेडरेशन लिमिटेड मुंबई कंत्राटदार यांच्याकडे नोंदवली आहे. तालुक्याच्या गोदामापर्यंत संच पोहोचविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे.
दिवाळीपूर्वी या पॅकेजचे वाटप करावयाचे असल्याने पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. पुरवठा यंत्रणा गोरगरिबांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, यासाठी कामाला लागली आहे. रेशन दुकानदारांनी या योजनेसाठी ऑनलाइन चलन भरून द्यायचे आहे. दुकानदारांना 94 रुपयांना हे किट मिळणार असून, त्याला सहा रुपये मार्जिन मिळेल. साधारणपणे 15 ते 20 ऑक्टोबरपर्यंत रेशनिंग दुकानांमध्ये हे किट उपलब्ध होईल
– दिनेश तावरे, परिमंडल अधिकारी, निगडी
पुणे विभागातील 27 लाख 71 हजार कुटुंबांना मिळणार लाभ
पुणे विभागामधील 27 लाख 71 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यात पिंपरी चिंचवडमधील एक लाख 28 हजार 476 कार्डधारकांचा समावेश आहे. अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेत चिंचवडमध्ये 41 हजार 592, भोसरीत 43 हजार 847 तर पिंपरी 37 हजार 37 कार्डधारक आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एका रेशन कार्डवर एकच किट मिळणार
केवळ 100 रुपयांमध्ये रवा, हरभरा डाळ, साखर व पामतेल हा शिधाजिन्नस संच रेशन दुकानावर मिळणार आहे. सध्या बाजारात या किराणा मालाची किंमत अंदाजे 300 रुपये आहे. दिवाळीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात महागाई वाढली तर हा किराणा जवळपास 350 रुपयांना मिळू शकतो. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गरिबांच्या किराणा खर्चात बचत होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजनेचे लाभार्थी मिळून एक लाख 28 हजार 407 रेशन कार्ड आहेत. प्रति रेशन कार्ड केवळ एक किट मिळणार आहे.