केबिनला टाळे लावून महापालिकेचा अधिकारी सुटीवर | पुढारी

केबिनला टाळे लावून महापालिकेचा अधिकारी सुटीवर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काही अधिकार्‍यांना पालिका कार्यालयातील केबिन हे स्वत:च्या मालकीचे असल्याचा समज करून घेतला आहे. एक अधिकारी महाशय तर, चक्क केबिनला टाळे लावून सुटीवर गेले आहेत. या प्रकारावरून आश्चर्य व संताप व्यक्त केला जात असून, त्याची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरवासीयांकडून जमा होणार्‍या मिळकतकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी, अग्निशामक परवाना आणि इतर वेगवेगळ्या शुल्कातून पालिकेचा गाडा हाकला जातो. त्या रक्कमेतूनच अधिकारी व कर्मचार्‍यांचे दरमहा वेतन केले जाते. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांचे सेवक असल्याचे शासकीय नियमावलीत स्पष्टपणे नमूद केले आहे.

मात्र, काही अधिकार्‍यांना पालिका ही आपली खासगी मालमत्ता असल्याचा गैरसमज झाला आहे. काही अधिकारी पालिकेचे केबिन व वाहन आपल्या मर्जीप्रमाणे वापरतात. शहराच्या हद्दीबाहेरही वाहन पळविले जाते. कार्यालयीन वेळेनंतर केबिनला संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांकडून टाळे लावले जाते. मात्र, काही अधिकारी केबिनची चावी आपल्याजवळ ठेवत असल्याचे प्रकार समोर आला आहे.
माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त रविकिरण घोडके हे 6 ते 17 ऑक्टोबर असे 12 दिवस सुटीवर आहेत. त्या काळात संबंधित विभागाचे कामकाज उपायुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. असे असताना घोडके यांनी तळमजल्यावरील त्यांच्या केबिनला चक्क टाळे लावले आहे.

केबिन स्वत:च्या मालकीचे असल्याप्रमाणे ते टाळे लावून निघून गेल्याने आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारामुळे आयुक्त शेखर सिंह यांचे अधिकार्यांवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर, या घटनेची पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

पदाधिकार्‍यांच्या केबिनवर अधिकार्‍यांचा ताबा
निवडणुका मुदतीमध्ये न झाल्याने महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. पालिकेतील अनेक अधिकार्‍यांना केबिन अपुरी पडत असल्याने त्यांनी थेट पदाधिकार्‍यांच्या केबिनचा ताबा घेतला आहे. सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विविध तीन उपायुक्त हे आपले कामकाज पदाधिकार्‍यांच्या केबिनमधून चालवित आहेत.

Back to top button