उंडवडी : पावसामुळे ज्वारीची पेरणी लांबणीवर, जमिनींना वाफसा मिळेना | पुढारी

उंडवडी : पावसामुळे ज्वारीची पेरणी लांबणीवर, जमिनींना वाफसा मिळेना

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील बागायती भागासह जिरायती भागातील शेतकरीही पावसाचा अंदाज घेऊन रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या करतात. त्यात खरीप हंगामातील बाजरीसह इतर पिकांच्या काढणीनंतर शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारीसह, हरभरा, कांदा, मका, भुईमुगाची पेरणी करण्यास सुरुवात करतात. चालू वर्षी जिरायती भागात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले आहे. शेती वापशावर येत नसल्याने शेतकर्‍यांना पेरण्या करणे कठीण झाले आहे.

त्यात यंदा जिरायती भागात उसाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याने बहुतांश शेती उसाला गुंतली, तर काही शेती जनावरांच्या चार्‍यासाठी गुंतली. जी शेती ज्वारीच्या पेरणीसाठी ठेवली, त्यातही पावसाचे पाणी साचल्याने यंदा ज्वारीच्या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. घट उठल्यानंतर दरवर्षी पाण्याचा अंदाज घेऊनच उंडवडी-सुपेसह आजूबाजूच्या परिसरात ज्वारीच्या पेरण्या शेतकरी करतात. परंतु, यंदा पाऊस भरपूर झाल्याने जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओल आहे. त्यामुळे पेरणी करणे शक्य नसल्याचे शेतकरी अशोक गवळी यांनी सांगितले.

Back to top button