जळोची : आयटी कर्मचारी ओव्हरलोडमुळे त्रस्त | पुढारी

जळोची : आयटी कर्मचारी ओव्हरलोडमुळे त्रस्त

जळोची; पुढारी वृत्तसेवा: कोरोना निर्बंध आता संपुष्टात आले असून, आयटी क्षेत्राचा अपवाद वगळता इतर सर्व क्षेत्रांतील कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. बहुतेक कर्मचारी हे कार्यालयात जाऊ लागले आहेत. परंतु कोरोना काळात कंपनीने दिलेले लॅपटॉप आणि डेस्कटॉप कंपनीने परत घेतले नसून, अजूनही अनेक कर्मचार्‍यांसाठी हे लॅपटॉप आणि डेस्कटॉप अतिरिक्त कामाची डोकेदुखी बनत आहेत. कोरोना काळात सर्वच लहान- मोठ्या कंपन्यांनी कर्मचार्‍यांना लॅपटॉप, डेस्कटॉप देऊन घरूनच काम करण्यास सांगितले होते.

देशात पहिल्यांदाच कोरोना काळात मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम सुरू होते. घरातच राहून काम करण्याची संकल्पना कर्मचार्‍यांना काही दिवस आनंद देणारी होती. परंतु हा आनंद आता त्रासदायक बनला आहे. कोरोना आटोक्यात आल्यानंतर कार्यालये सुरू झाली आहेत.

अनेक जण कार्यालयात जात आहेत. परंतु घरी आल्यानंतर आणि साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही काम माथी मारले जात आहे. कोरोना काळात कंपनीने दिलेले संगणक आता त्यांच्याकडून ओव्हरटाइम करवून घेत आहेत. कर्मचार्‍यांकडून कार्यालयासोबत घरूनही काम करून घेत आहेत. सुटीच्या दिवशीही काही वेळ कामासाठी देण्यास त्यांना भाग पाडले जात आहे. यामुळे अनेकांचे कौटुंबिक जीवन कार्यालयीन कामास समर्पित झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात घरी आलेले आयटी कर्मचारी अद्यापही पुणे जिल्ह्याच्या विविध तालुका, गाव येथून कंपनीचे काम करून देत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात कार्यालयामध्ये त्यांना जाता आले नाही. इतर कार्यालये सुरू झाली, पण आयटी क्षेत्रात घरातून करावे लागणारे काम नकोसे झाले असल्याचे आयटी कर्मचारी सांगत आहेत.

कोरोना काळात बारामतीला आलो होतो. त्या दिवसांपासून अजूनही घरातूनच काम सुरू आहे. पुण्यात कार्यालयात जाण्याची गरज नाही. परंतु कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. कामाचा प्रचंड लोड वाढवून दिला जात आहे. त्यामुळे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
                                                           – महेश जगताप, आयटी कर्मचारी

Back to top button