पिंपरी : 10 वर्षे होऊनही ‘बीआरटी’ मार्ग अपूर्णच ! महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात | पुढारी

पिंपरी : 10 वर्षे होऊनही ‘बीआरटी’ मार्ग अपूर्णच ! महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात

मिलिंद कांबळे :

पिंपरी : नागरिकांना जलद गतीने सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सहा बीआरटीएस मार्गाचे जाळे उभारण्याचे नियोजन केले; मात्र, दहा वर्षापेक्षा अधिक काळ उलटूनही काही मार्गावर अद्याप बस सेवाच सुरू झाली नसल्याने कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसत आहे. खर्चासाठी पालिका वारेमाप उधळपट्टी करीत असून, दुसरीकडे उदासीन पीएमपीएल कंपनी बस नसल्याचे कारण देत पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी प्रकल्पाबाबत दुजाभाव करीत आहे. या विविध कारणांमुळे जलदगती बस सेवेपासून शहरवासीय वंचित आहेत.

दापोडी-निगडी सेवा रडतखडत
मोठा गाजावाजा करीत शहरात बीआरटी मार्ग बांधण्यात आले. नाशिक फाटा ते वाकड आणि सांगवी फाटा ते किवळे या मार्गावर सेवा सुरू झाली. न्यायालयीन लढ्यानंतर दापोडी ते निगडी सेवा रखडखडत सुरू झाली. मात्र, इतर किवळे ते निगडी मार्गावर जागा ताब्यात नसल्याने उड्डाणपुलाचे काम पूर्ण न झाल्याने हा रस्ता अपूर्ण आहे. परिणामी, बस सेवा ठप्प आहे. ती जागा नुकतीच पालिकेच्या ताब्यात आली असून, तेथील अतिउच्चदाब विद्युत वाहिन्या उभारण्याचे काम सुरू आहे. एकूण 5 खांब उभारण्यात आले आहेत. तसेच, रेल्वे व
एमएसईबीची फिडर लाइनही स्थलांतरित करावी लागणार आहे. त्यानंतर उड्डाणपूल व जोडरस्ता बांधण्यात येईल. त्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मार्गातील लघुउद्योगांचे स्थलांतर रखडले
तर, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटी मार्गावरील ऑटो क्लस्टर व आयुक्त बंगल्यासमोरील युरोसिटी व इंड्रोलिक इंडस्ट्रियलची केवळ साडेतीन हजार चौरस मीटर जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्या उद्योगांना पालिकेने सन 2007 ला नोटीस दिली होती. त्या जागेतील कंपन्या व लघुउद्योगांचे इतरत्र स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यानंतर ती जागा पालिकेस उपलब्ध होणार आहे. त्यास किमान दहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. वळसा मारून या मार्गावरून रडतखडत बस सेवा सुरू आहे. तसेच, बोपखेल ते दिघी मार्ग तयार होऊनही त्या मार्गावर बस सुरू नाही.

बीआरटी बस उपलब्ध नसल्याचे कारण
पालिकेने अनेक घरे व दुकानांवर बुलडोझर चालवून तसेच, कोट्यवधी रूपये खर्च करून बीआरटी मार्ग बांधले आहेत. त्याच्या दुरूस्तीरवही लाखोंचा खर्च सुरूच आहे. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून वरील मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे तो खर्च वाया गेला आहे. अनेक थांब्यांची दुरवस्था झाली आहे. पिंपरी-चिंचवडबाबत दुजाभाव करणार्‍या पीएमपीकडून बीआरटी बस उपलब्ध नसल्याचे कारण देत हात वर केले जात आहेत. त्यामुळे बीआरटीचे अनेक मार्ग धूळखात आहेत. मात्र, पीएमपीएलकडून संचलन तुटीसाठी पालिकेकडून दरमहा 40 टक्के निधी हक्काने वसूल केला जात आहे. पालिका तो निधी अदाही करीत आहे. मात्र, शहरावासी जलद प्रवासी सेवेपासून वंचित असल्याबद्दल कोणालाच देणे-घेेणे नसल्याचे चित्र आहे.

स्मार्ट बसथांबे भिकार्‍यांचे आश्रयस्थान :
कोट्यवधी खर्च करून पालिकेने बीआरटीएसचे स्मार्ट थांबे उभारले आहेत. मात्र, त्यांची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्याने तेथे अस्वच्छता आहे. गुटखा, पान व तंबाखूच्या पिचकार्‍या भिंतीवर दिसतात. तसेच, प्रकाश व्यवस्थाही अपुरी असते. दुर्लक्षित थांबे हे भिकार्‍यांचे आश्रयस्थान झाले आहेत. खराब थांबे दुरुस्त केले जात नसल्याने शहर सौंदर्याचे विद्रूपीकरण होत आहे.

जागा ताब्यात घेऊन कार्यवाहीस वेग :
ऑटो क्लस्टरसमोरील बीआरटी मार्गावरील उद्योगाचे स्थलांतर करण्यासाठी त्यांना एमआयडीसीच्या केएसबी चौकातील डी टू ब्लॉक येथील जागा देण्यात आली आहे. त्यासाठी 7 कोटी पालिकेने एमआयडीसीला दिले आहेत. बांधकाम परवानगी घेतल्यानंतर 9 महिन्यात उद्योजक बांधकाम पूर्ण करणार आहेत. त्या कालावधीत ती जागा पालिकेस हस्तांतरण होईल. जागा ताब्यात येताच रस्ता जोडला जाणार आहे. रावेत येथील उड्डाणपुलाला जोडणार्‍या जागेसंदर्भात न्यायालयात वाद होता. जागा मालकांना नुकसानभरपाई देण्यात आली असून, तेथे अतिउच्चदाब विद्युतवाहिनी स्थलांतर करण्याचे काम सुरू झाले; तसेच इतर सेवावाहिन्यांचे स्थलांतर झाल्यानंतर उर्वरित उड्डाणपूल व अ‍ॅप्रोच रस्त्याचे काम साडेचार महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे स्थापत्य प्रकल्प विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

Back to top button